ऊसतोडणीतसाठी शेतकरी मेटाकुटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:41+5:302021-03-07T04:30:41+5:30
राजेश राजगूरु तलवाडा शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे ...

ऊसतोडणीतसाठी शेतकरी मेटाकुटीला
राजेश राजगूरु
तलवाडा
शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे येणार नाहीत, हे शक्यच नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. ऊसतोड मजुरांकडून ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होताना दिसत आहे.यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मात्र भरडला जातोय. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पैसे येण्याअगोदर या लोकांची भरती करावी लागत असल्याने ऊसतोडणीतही शेतकरी मेटाकुटीला येत आहे.
कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी व इतर पिकांच्या उत्पन्नाची शाश्वती दिवसेंदिवस कमी होत असल्याने तालुक्यातील शेतकरी भरवशाचे पीक म्हणून उसाच्या लागवडीवर भर देत आहे.
इतर पिकांच्या तुलनेत एकरी ३०-४० टनापर्यंत ऊस निघाला तर परवडतो, अशा विश्वासामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
मात्र ऊसतोडणीसाठी एकरी पाच ते दहा हजार रुपयांचा दर या मजुरांनी ठेवलेला आहे. त्यातच प्रत्येक खेपेला वाहनचालकास कारखान्याच्या अंतरानुसार पाचशे ते एक हजार रुपये द्यावे लागत आहेत. ऊस गाळपासाठी नेण्यास शेतकऱ्यांचा विशिष्ट कोड घ्यावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते. हा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू आहे. याबाबत तक्रार करण्यास कोणताही शेतकरी धजावत नसल्याने या लोकांचे जास्तच फावले आहे.
एकरी १०-१२ हजारांचा खर्च
मजुरांनी ऊसतोडणीचे रेटकार्डच बनवलेले आहेत. यात मजुर एकरी ५-१० हजार,चालक खेपेला ५००-१००० रुपये, एकरी २-३ खेपा जातात. कोडचे १००० रुपये, कारखान्याच्या कर्मचाऱ्यास असा एकरी १०-१२ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येत आहे.
मजुरांबद्दल सहानुभती शेतकऱ्यांच्या मुळावर
ऊसतोड कामगारांना मोठ्या कष्टाचे काम करावे लागते. याबाबत सगळीकडून सहानुभूती व आत्मियतेची भावना मिळते.मात्र या मजुरांना कारखान्याकडून टनाप्रमाणे मजुरी मिळते. उसाचे वाढे विकूनही थोडेफार पैसे मिळतात. आणि ऊसतोडणीसाठी शेतकरीही खुशीने एकरी २-३ हजार देत असतात; पण ऊसतोड मजुर शेतकऱ्यांची कीव करताना दिसत नाही. अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.
काही कारखान्यांचेच नियंत्रण
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीवर तसेच कारखान्यांच्या मजुरांवर कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. ऊसतोडणीसाठी मजुरांनी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास कारखान्याकडून गंभीर दखल घेत शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यात येतात असा दंडक एक- दोन कारखान्यांनीच ठेवला आहे.
पैसे कमी दिल्यास करतात नुकसान
एखाद्या शेतकऱ्याने या मजुरांना थोडेफार कमी पैसे दिल्यास ऊस जमिनीपासून न तोडता वरूनच तोडणे, वाढ्याला उसाच्या कांड्या ठेवणे, पाचटात टिपरे ठेवणे, अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान करतात.
प्रतिक्रिया
माझ्या शेतात अडीच एकरात ऊस होता. माझ्याकडे बाहेरील कारखान्याचे मजूर होते. त्या मजुरांना एकरी दहा व चालक मिळून मला ३०,००० रुपये खर्च आला.
- अशोक बेडके, शेतकरी, राजापूर