महिला रूग्ण, कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 18:12 IST2021-08-24T18:10:43+5:302021-08-24T18:12:28+5:30
माजलगाव तालुक्यातील गंगामसला आरोग्य केंद्रात डॉ.राहुल कोकाटे हे ऑगस्ट २०१९ मध्ये रूजू झाले.

महिला रूग्ण, कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी
- सोमनाथ खताळ
बीड : उपचारासाठी आलेल्या महिला रूग्णांसह आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या डॉ.राहुल कोकाटे या वैद्यकीय अधिकाऱ्याची बीड आरोग्य विभागातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गंगामसला व पात्रूड आरोग्य केंद्रातील महिलांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. या गैरप्रकाराने खळबळ उडाली आहे.
माजलगाव तालुक्यातील गंगामसला आरोग्य केंद्रात डॉ.राहुल कोकाटे हे ऑगस्ट २०१९ मध्ये रूजू झाले. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये प्रकृती खराब असून मी तणावात असल्याने मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत असल्याचे सांगत रजेवर गेले. त्यानंतर येरवाडा येथील मनोरूग्णालयासह इतर वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्यांना ऑगस्ट २०२० रोजी पुन्हा रूजू करून घेतले. परंतू गंगामसला येथील तक्रारी वाढल्याने पात्रूड आरोग्य केंद्रात त्यांना पाठविण्यात आले. येथेही त्यांच्या तक्रारी वाढत गेल्या. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी केल्यावर तथ्य आढळले. तसेच सर्व तक्रारदार आणि कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली. यात डॉ.कोकाटे दोषी आढळल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना बीड आरोग्य विभागातून कार्यमुक्त केले. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
लसीकरण कक्षातच ठिय्या
ज्या ठिकाणी महिला कोरोना लस घेण्यासाठी येतात, त्याच ठिकाणी डॉ.राहुल कोकाटे ठिय्या मांडत असत. महिलांनी तक्रार केल्यानंतरही ते तेथून उठत नव्हते. याबाबत परिचारीकांकडे तक्रार केल्यानंतरही यात सुधारणा झाली नाही. तसेच उपचारासाठी आलेल्या महिला रूग्णांशीही त्यांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे चाैकशीत सिद्ध झाले आहे. या सर्व तक्रारी आणि चौकशी अहवालावरून त्यांना बीड आरोग्य विभागाच्या अस्थापनेवरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
रिक्तपदाबाबत पाठपुरावा करू
गंगामसला आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आता येथे एकच वैद्यकीय अधिकारी आहे. रिक्त पदावर दुसरे डॉक्टर देण्याबाबत वरिष्ठांकडे मागणी करून पाठपुरावा करण्यात येईल. रूग्णसेवा कमी होणार नाही, याची काळजी घेऊ.
- डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी माजलगाव