खळबळजनक ! ऐन दिवाळीच्या दिवशी एसटी चालकाचा कडा बसस्थानकात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 16:37 IST2021-11-04T16:35:44+5:302021-11-04T16:37:15+5:30
ST driver attempts suicide: चालकाची प्रकृती चिंताजनक असून विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे.

खळबळजनक ! ऐन दिवाळीच्या दिवशी एसटी चालकाचा कडा बसस्थानकात आत्महत्येचा प्रयत्न
- नितीन कांबळे
कडा ( बीड ) : जामखेड-पुणे बसवरील चालकाने कडा बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (ST driver attempts suicide ) केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बाळू महादेव कदम ( ३५, रा.आष्टी ) असे चालकाचे नाव असून ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. आज दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( MH 20,BL 2086 ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले.
चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे आणि वाहक यांनी त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे.