खळबळजनक ! महिलेच्या घरात आढळला वेटरचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 13:39 IST2021-09-14T13:38:32+5:302021-09-14T13:39:26+5:30
खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांची पोलीस ठाण्यात गर्दी

खळबळजनक ! महिलेच्या घरात आढळला वेटरचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह
कडा ( बीड ): शहरातील सुंदर नगर येथे राहणाऱ्या एका वेटर तरूणाचा मृतदेह एका महिलेच्या घरात गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत मंगळवारी सकाळी आढळून आला. यामुळे तरूणाची हत्या की आत्महत्या अशी चर्चा शहराभर सुरू आहे. मन्सुर चाॅद शेख असे मृत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदर नगर येथे राहणारा मन्सुर चाॅद शेख (२२) एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत असे. आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती लगत एका भाडेकरू महिलेच्या घरात त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेने लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस शिपाई बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. घरात मृतदेह आढळून आल्याची वार्ता शहरात पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती. ही हत्या की आत्महत्या याबद्दल तर्कवितर्क सुरू असून उत्तरीय तपासणीनंतरच याचा खुलासा होणार आहे. पोलीस पूढील तपास करत आहेत. दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल करा तेव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेत पोलीस चौकीत गर्दी केली आहे.