माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:25+5:302021-07-18T04:24:25+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढ महिन्यात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहिताना माहेरी जाता येत ...

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा,
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढ महिन्यात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहिताना माहेरी जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी स्थिती नवविवाहितांची झाली आहे.
मराठी महिन्यांप्रमाणे वर्षाचा चौथा महिना आषाढ येतो. पावसाळ्याचे आगमन याच महिन्यातच होते. या महिन्यातील महत्त्वपूर्ण पहिल्या सणाला नवविवाहिता माहेरी जाण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितेला पावसाळा लागताच माहेरी घेऊन जाण्याची प्रथा आहे. आषाढ महिना लागला की प्रत्येक नवविवाहिता काही दिवसांसाठी तरी माहेरी जाते. माहेराची ओढ तिला या काळात लागलेली असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे जाणे बंद झालेले आहे. नवविवाहितांचे डोळे आपल्या माहेराकडे लागून राहिले आहेत. कधी आपल्या माहेरचा भाऊ किंवा नातलग येतो आणि आपल्याला घरी नेतो, ही लगबग तिला लागून राहिलेली असते. अशा स्थितीत या नैसर्गिक महामारीने बाहेर जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे तिचे दुःख सांगता येणे कठीण बनले आहे.
नवविवाहित मुलीच्या आईच्या भावना
विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीला आषाढामध्ये माहेरी आणण्याची प्रथा आहे; मात्र कोरोनामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत करून ठेवले आहे. त्यामुळे येवढे वर्ष माहेरी न येता, प्रत्येक मुलीने आपल्या सासरलाच माहेर समजून त्या ठिकाणीच सण, उत्सव साजरे करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, प्रत्येकाने घरात राहून काळजी घेणे आज गरजेचे झालेले आहे.
- रेखा अविनाश तळणीकर.
कोरोनामुळे यंदा मुलींना पहिल्या सणाला माहेरी जाता येत नाही. माहेरी जाण्याची प्रत्येक नवविवाहिता आतुरतेने वाट पाहते; मात्र यदा कोरोनामुळे बाहेर न पडणेच योग्य आहे.
- आशा पुरंदरे.
काय म्हणतात नवविवाहिता...
पहिल्या सणाला माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक विवाहितेला असते. प्रत्येकीच्या मनात माहेरी जाण्याची प्रचंड उत्सुकता असते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाहेरगावी जाणे टाळणे आणि घरी थांबणे हेच महत्त्वाचे आहे. माझे सासरच, माझे माहेर झाले आहे.
- पल्लवी मोरगावकर
कोरोनामुळे नवविवाहितांची माहेराची वाटही अडविल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आषाढीला माहेरी जाण्याची खूप इच्छा होती. माहेरच्या मंडळींची खूप आठवण येते. माहेरातील संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते; मात्र सध्याच्या वातावरणात प्रवास करणे शक्य नाही.
- रेवती चोपणे.