माजलगाव (जि. बीड) : माजलगावात शहरातील गणपती मंदिर व सोळंके महाविद्यालयात गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांची अँटिजन चाचणी सुरू असून, यात कोरेाना पॉझिटिव्ह निघालेले ३ रुग्ण कोणालाही न सांगता मंगळवारी पळून गेले. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर हे रुग्ण निघून गेले. आता ते भररस्त्यावर फिरत असल्याने धोका वाढला आहे.
जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, प्रशासनाने व्यापाऱ्यांना अँटिजन चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणीसाठी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. यात अनेक जण पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी गणपती मंदिरात चाचणीनंतर पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण कोणालाही न सांगता फोनवर बोलत-बोलत गुपचूप निघून गेले. निघून जाताना त्यांना आरोग्य विभागाचे कर्मचारी व अनेक व्यापाऱ्यांनी पाहिले. मात्र, कोणी अडविण्याचा प्रयत्न केला नाही. मागील तीन दिवसांत १,६८० व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. यात ८७ व्यापारी पॉझिटिव्ह आले होते. बुधवारी व्यापाऱ्यांच्या अँटिजन चाचणीचा शेवटचा दिवस असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.
पोलिसांना माहिती देण्यात येईल जे पॉझिटिव्ह रुग्ण निघून गेले असतील, त्याबाबत व्यापारी संघास कळविले आहे. त्यांना त्या रुग्णांना परत पाठविण्याबाबत सांगितले आहे. रुग्ण परत न आल्यास पोलिसांना सांगून आणण्यात येतील.-डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव