विश्वकोश हा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:56+5:302021-02-26T04:46:56+5:30
बीड : येथील माउली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाद्वारा विद्यार्थिनींसाठी विश्वकोश हाताळणी उपक्रम २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात ...

विश्वकोश हा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे
बीड : येथील माउली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाद्वारा विद्यार्थिनींसाठी विश्वकोश हाताळणी उपक्रम २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. कोविड -१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व नियमांचे काटेकोर पालन करून विश्वकोश हाताळण्याचा उपक्रम पार पडला. उद्घाटन प्राचार्या डॉ. सविता शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मुद्रित साहित्य ज्ञानकोश, विश्वकोश व इंटरनेट वरील उपलब्ध विकिपीडिया या मधील साम्य स्पष्ट केले. विश्वकोशामध्ये सर्व ज्ञान साहित्याचा समावेश असतो. वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने ग्रंथालयीन विश्वकोश हा खूप महत्वपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे. याचे ज्ञान, माहिती हाताळणे, संदर्भ घेणे इत्यादी संशोधनात्मक दृष्टिकोनातून हा उपक्रम किती महत्वपूर्ण ठरतो हे त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले. विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त ऑनलाईन ग्रंथालयीन सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, ई - सुविधा, ई - ग्रंथालय, ई-क्लासेसचा विद्यार्थिनींनी उपयोग करून घेणे आज काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकांनी आप- आपले कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थिनींनी ऑनलाईन तासिका, ऑनलाईन ई साहित्य, ऑनलाईन कार्यक्रमामध्ये हजर राहणे,लाभ घेणे किती गरजेचे आहे हे त्यांनी समजावून सांगितले. ग्रंथपाल ज्योती मगर यांनी या उपक्रमामध्ये मांडणी केलेल्या विश्वकोशाची माहिती प्रास्ताविकातून सांगितली. हे ज्ञानकोश / विश्वकोश, संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत या विषयी विद्यार्थिनींना माहिती देतांना मराठी भाषेतील विश्वकोश अ ते ज्ञ पर्यंत अनुवर्ण पद्धतीने हाताळावेत व इंग्रजी भाषेतील कोश ‘ए’ टू ‘झेड’या अल्फाबेटिकल क्रम पद्धतीने हाताळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्याला हवी ती माहिती घेणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने संदर्भ देणे या विषयी त्यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन ग्रंथपाल ज्योती मगर यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.