Election of Parli Municipal Council Subject Committees without any objection | राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही सेनेचा सभापती; धनंजय मुंडेनी पाळला 'महाविकास आघाडी' धर्म

राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही सेनेचा सभापती; धनंजय मुंडेनी पाळला 'महाविकास आघाडी' धर्म

ठळक मुद्देशहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकास सभापती पदी संधी

परळी -राष्ट्रवादी काँग्रेसचे  स्पष्ट बहुमत असलेल्या येथील  नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांवर  सभापतींची  विशेष सर्व साधारण सभेत शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण ५ सभापती पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ४  तर शिवसेनेला १ पद मिळाले आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही शिवसेनेला सभापती पद दिल्याने धनंजय मुंडे यांनी 'महाविकास आघाडी' धर्म पाळल्याचे दिसून आले.

परळी नगरपालिकेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे. आज झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेत न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या उपस्थितीत सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. प्रत्येक सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या. सभापती निवडीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे दिसून आले. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे पीठासन अधिकारी म्हणुन उपस्थित असलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेत सभापतीची निवड करण्यात आली. बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेविका अन्नपुर्णा शंकरराव आडेपवार, स्वच्छता व आरोग्य सभापती - अन्वर मिस्कीन, पाणीपुरवठा सभापती-  उर्मिला गोविंदराव मुंडे, शिक्षण  सभापती - गोपाळ आंधळे तर महिला व बालकल्याण सभापती- शिवसेनेच्या नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सरोजनी सोमनाथआप्पा  हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, मुख्याधिकारी अरविंद मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. 

विशेष म्हणजे, शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गोपाळ आंधळे व  शिवसेना नगरसेविका गंगासागरबाई शिंदे या दोन्ही नगरसेवकांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे. नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपद तिसऱ्यांदा आले आहे. तर शिंदे यांना महिला व बालकल्याण सभापती पद मिळाले आहे. 

Web Title: Election of Parli Municipal Council Subject Committees without any objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.