'गोपीनाथराव मुंडेंनंतर एकनाथ शिंदे ताकदीचे नेते'; शरद पवारांना सोडत राज्य उपाध्यक्ष शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:37 IST2025-11-27T18:34:57+5:302025-11-27T18:37:10+5:30
पक्षात कुचंबना होत असल्याचा आरोप करत फुलचंद कराडांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश

'गोपीनाथराव मुंडेंनंतर एकनाथ शिंदे ताकदीचे नेते'; शरद पवारांना सोडत राज्य उपाध्यक्ष शिंदेसेनेत
परळी : गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)मध्ये प्रामाणिकपणे काम करूनही आपली सतत कुचंबना होत असल्याचा आरोप करत पक्षाचे राज्य उपाध्यक्ष फुलचंद कराड यांनी अखेर बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. सिंदखेडराजा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी परळीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कराड म्हणाले, “शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे पण राष्ट्रवादी पक्षात गेल्या दोन वर्षांत आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या विजयासाठी चांगले काम केले, मात्र ते निवडून आल्यानंतर आमच्याशी कधीच संपर्कात राहिले नाहीत.”
पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे नेतृत्व खंबीर असल्याचे सांगितले. “गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर एवढे ताकदीचे नेतृत्व आम्हाला आता मिळाले आहे. राज्यभर शिवसेना शिंदेपक्षासाठी काम करू तसेच भगवान सेना देखील या पक्षाच्या पाठीशी उभी करू,” असे फुलचंद कराड यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला दादाहारी (वडगाव) येथील माजी सरपंच शिवाजी शिंदे उपस्थित होते.