द्वारकादास मंत्री बँक गैरव्यवहार, अध्यक्ष सुभाष सारडांसह २८ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 18:03 IST2021-12-18T18:02:49+5:302021-12-18T18:03:47+5:30
गुन्हा नोंदविण्यापूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मात्र, अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला

द्वारकादास मंत्री बँक गैरव्यवहार, अध्यक्ष सुभाष सारडांसह २८ जणांवर गुन्हा
बीड: येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्ष सुभाष सारडांसह २८ जणांवर आज शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, गुन्हा नोंदविण्यापूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मात्र, अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
जिल्ह्याच्या सहकारी वर्तुळातील नावाजलेली बँक म्हणून द्वारकादास मंत्री सहकारी बँकेची ओळख हाेती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बँकेचा कारभार प्रशासकीय मंडळ चालवत आहे. मंत्री बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य तथा लेखा परीक्षक श्रेणी (१) बी.बी. चाळक यांनी १८ डिसेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्यात तकार दिली. त्यावरुन अध्यक्ष सुभाष सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम सोहनी यांच्यासह २३ संचालक व चार तत्कालीन व्यवस्थापक अशा एकूण २८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यातील गैरव्यवहाराची रक्कम व इतर माहिती तपासात समोर येईल, असे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.
पाच तासानंतर गुन्हा
दरम्यान, बी.बी. चाळक हे फिर्याद देण्यासाठी शनिवारी दुपारी १२ वाजता शिवाजीनगर ठाण्यात गेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक संतोष वाळके स्वत: शिवाजीनगर ठाण्यात ठाण मांडून होते. तब्बल पाच तासांनंतर गुन्हा नोंदविण्यात आला.