निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:34 IST2018-03-30T17:30:35+5:302018-03-31T05:34:36+5:30
शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले.

निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई (बीड) : शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. उत्खननातून पुढे काय काय निघते याची मोठी उत्सुकता लागलेली असताना निधी संपल्याचे कारण पुढे करीत काम बंद करण्यात आले. परिणामी अंबाजोगाईकरांच्या अपेक्षा पुन्हा लांबणीवर टांगण्यात आल्या आहेत.
शहरातील पुरातन व ऐतिहासिक ठेवा असलेल्या सकलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले होते. अंबाजोगाईकरांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने औरंगाबाद येथील उपसंचालक पुरातत्व विभाग यांना सकलेश्वर मंदिराच्या उत्खननासाठी वरिष्ठ पातळीवरून चार लाखांचा निधी प्राप्त झाला होता. आलेला हा निधी मार्च अखेरपर्यंत न संपल्यास तो निधी परत जातो. यामुळे पुरातत्व विभागाच्या वतीने १८ मार्च ते २८ मार्च असे दहा दिवस उत्खननाचे काम झाले. या उत्खननात मंदिराचा शोध लागला. तसेच अनेक दुर्मिळ अवशेष या उत्खननातून सापडले. नवीन निघालेल्या मंदिराच्या पाया भागात रंगशीळा, पुरातन विष्णूंची मूर्ती, तत्कालिन खापरी भांडयाचे तुकडे, दगडाप्रमाणेच विटा निघाल्या. पुरातत्व विभागाच्या सहा जणांच्या पथकाने दहा दिवसात हे काम केले. मात्र आता झालेले उत्खननाचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नाही.
पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन झालेल्या परिसरात दक्षिण-पश्चिम बाजूस दगडी शिळेच्या पुरातन पायऱ्या निघाल्या. याचेही काम अर्धवट राहिले आहे. तर मंदिराच्या समोरील बाजूस मोठे कुंड असून हे कुंड आहे की तलाव आहे. हे उत्खननातूनच समोर येईल. मात्र, उत्खनन बंद झाल्याने ही कामे अपूर्णच राहिली. मंदिराच्या उत्तर बाजूस ज्या ढिगाऱ्याखाली मंदिर सापडले. त्या परिसरात त्रिदल मंदिर असावेत असा अंदाजही पुरातत्व विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. मंदिराचे गर्भगृह मंडळ हा भाग उत्खननातून समोर येईल. अशी अपेक्षा अंबाजोगाईकर बाळगून होते. मात्र, पुरातत्व विभागाने निधी संपला हे कारण पुढे केल्याने उर्वरित कामे ठप्प झाली आहेत.
पर्यटकांची सुरू झाली होती मोठी गर्दी
येथील उत्खननातून मंदिराचा शोध लागल्याची बातमी लोकमतमधून प्रसिद्ध होताच मंदिराकडे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. उत्खननातून अनेक बाबी समोर येतील अशी अपेक्षा अंबाजोगाईकर बाळगून होते. सलग दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर उत्खननाचे काम अचानक थांबल्याने अंबाजोगाईकरांचा मोठा हिरमोड झाला आहे.
निधी उपलब्ध होताच काम सुरू
सकलेश्वर मंदिराच्या कामकाजासाठी पहिल्या टप्प्यात फक्त ४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यातले काम संपले पुढील काम करण्यासाठी निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित काम सुरू होईल. मात्र, हे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागेल हे सांगता येत नाही. अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाच्या तंत्रसहाय्यक निलिमा मार्कंडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.