कोरोनामुळे वर्षभर आरोग्य विभागच """"व्हेंटीलेटरवर""""
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:26+5:302020-12-30T04:43:26+5:30
२४ तास ऑन ड्यूटी : क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह शब्दांनी उडवली झोप बीड : वर्षांच्या सुरूवातीपासूनच कोरोनाची दहशत निर्माण ...

कोरोनामुळे वर्षभर आरोग्य विभागच """"व्हेंटीलेटरवर""""
२४ तास ऑन ड्यूटी : क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह शब्दांनी उडवली झोप
बीड : वर्षांच्या सुरूवातीपासूनच कोरोनाची दहशत निर्माण झाली. प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार आदी कामे करण्यासाठी आरोग्य विभाग २४ तास ऑन ड्यूटी होता. कधीतरी कानी पडणाऱ्या क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या शब्दांनी तर झोपच उडवली होती. यामुळे २०२० या वर्षात आरोग्य विभागच ''''''''व्हेंटीलेटरवर'''''''' राहिला होता. त्यांच्या कामाचे सामान्यांकडून कायम कौतुक करण्यात आले.
जानेवारीच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात कोरोनाची दहशत आली. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. तसेच जिल्ह्यात १८ ठिकाणी नाकाबंदी करून बाहेरून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना इन्स्टिट्यूशनल, होम क्वारंटाईन केले. नंतर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक उसतोड कामगारांची आरोग्य तपासणी केली. राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना बीड जिल्ह्यात कोरोना वेशीवरच रोखला होता. १६ एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील ईटकुरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तात्काळ ३ किमी पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन करून विशेष पथकासह १२ दिवस तपासणी आणि सर्वेक्षण केले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत कंटेनमेंट झोन आणि सर्वेक्षण सुरू राहिले. नंतर रुग्ण वाढले आणि हे बंद झाले. या वर्षभरात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्यासह शिपाई ते अधिकारी या सर्वांनीच २४ तास काम केले. नियंत्रण कक्षातील सर्वांनीच खूप परिश्रम घेतले.
थोरातांची बदली, गित्ते रूजू
तीन वर्षे कालावधी पूर्ण झाल्याने डॉ.अशोक थोरात यांची बदली होऊन त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सूर्यकांत गित्ते रूजू झाले. त्याबरोबच केज, रायमोहा, पाटोदा, गेवराई, नेकनूर, आष्टी येथेही हक्काचे वैद्यकीय अधीक्षक मिळाले.
कोरोनामुळे शस्त्रक्रिया घटल्या
कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले होते. सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनातच व्यस्त होती. यामुळे ओपीडी, आयपीडी आणि किरकोळ शस्त्रक्रिया गतवर्षीच्या तुलनेत घटल्या.
कोरोना मृत्यू रोखण्यात अपयश
कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यश आले असले तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश आले. उपचार आणि सुविधांबद्दल कायम तक्रारी राहिल्या. आजही राज्य आणि देशाच्या तुलनेत जिल्ह्याचा डेथ रेट दुप्पट आहे.
मुलींचा जन्मदर वाढला
जिल्ह्यात २०२० मध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. १ हजार मुलांमागे ९४७ मुली आहेत. तसेच बालमृत्यू आणि बालविवाहाचेही प्रमाण कमी झाले आहे. परंतु राष्ट्रीय कुटूंब सर्वेक्षणानुसार पुरूषांपेक्षा महिलांना जास्त टेन्शन असल्याचेही समोर आले आहे.