बुट्टेनाथ दरीत धाड, दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:30 IST2019-08-04T00:29:26+5:302019-08-04T00:30:34+5:30
अंबाजोगाईलगतच्या बुट्टेनाथ दरी परिसरातील हातभट्टी अड्डयांवर धाडी टाकून २ लाख १४ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक व अंबाजोगाई येथील पथकाने संयुक्त कारवाई केली.

बुट्टेनाथ दरीत धाड, दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट
बीड : अंबाजोगाईलगतच्या बुट्टेनाथ दरी परिसरातील हातभट्टी अड्डयांवर धाडी टाकून २ लाख १४ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक व अंबाजोगाई येथील पथकाने संयुक्त कारवाई केली.
बुट्टेनाथ दरी परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर सामूहिक मोहीम राबवून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे ९ हजार ६४५ लिटर रसायन व ४० किलो काळा गूळ असा एकूण २ लाख १४ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. सणासुदीचा काळ लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्या, रोडलगत असणारे धाबे व अवैध दारू विक्र ी केंद्रांवर धाडी टाकून कारवाया सुरू केल्या आहेत. एप्रिल ते जुलै २०१९ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विरोधात मोहीम राबवून २३५ गुन्हे नोंदवले आहेत. तर १३९ आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलमांतर्गत अटक केलेली आहे. सदर कालावधीत विभागाने ४०५ लिटर हातभट्टी दारू , दारू गाळण्यासाठी लागणारे ९५ हजार ६४० लिटर रसायन, ५७५ लिटर देशी दारू, १४२ लिटर विदेशी दारू , १२४ लिटर बियर, ११० लिटर परराज्यातील मद्य, १११७ लिटर ताडी, तसेच ६ दुचाकी व ४ चारचाकी वाहने जप्त केली आहेत. अशाप्रकारे चार महिन्यांच्या कालावधीत ४१ लाख १७ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.