'माझा शोध घेऊ नका'; सुसाईड नोट लिहून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:36 IST2020-11-18T14:34:25+5:302020-11-18T14:36:38+5:30
शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारातील एका विहिरीत आढळला मृतदेह

'माझा शोध घेऊ नका'; सुसाईड नोट लिहून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
गेवराई : शहरातील गणेश नगर भागातील ११ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली एक मुलगी सोमवारी ( दि. १६ ) पहाटे घरातून निघून गेली होती. या मुलीचा मृतदेह शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारातील एका विहिरीत बुधवारी सकाळी आढळून आला. सायली कल्याण पारेकर (१७ ) असे मृत मुलीचे नाव असून याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.
सायली पारेकर ही ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. सोमवारी पहाटे घरातून बाहेर पडताना सायलीने, ' मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, अशी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध सुरु केला होता. मंगळवारी पोलिसात तक्रार सुद्धा देण्यात आली होती. यानंतर पोलीसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तपास सुरु केला. मात्र यात पोलिसांना काही धागेदोरे मिळाले नाही.
बुधवारी सकाळी गोविंदवाडी शिवारात मॉर्निंग वॉक करत असताना नागरिकांना येथील विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो सायलीचा असल्याचे स्पष्ट झाले. सायलीने आत्महत्यचे कारण समजू शकले नसून पोलीस तपास सुरु आहे.