डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ‘कोरोना’ची लस घ्यायला वाटतेय भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:00+5:302021-01-08T05:48:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाची लस कोणती व कधी येणार, याबाबत जिल्हा आरोग्य विभागाला शासनस्तरावरून कसलीच माहिती ...

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ‘कोरोना’ची लस घ्यायला वाटतेय भीती !
लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाची लस कोणती व कधी येणार, याबाबत जिल्हा आरोग्य विभागाला शासनस्तरावरून कसलीच माहिती नाही. असे असले तरी आरोग्य विभाग अचानक सूचना प्राप्त झाल्या तरी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त माहिती संकलित झालेली आहे; परंतु गैरसमज व साइड इफेक्टच्या भीतीने काही लोकांच्या मनात भीती असल्याचे दिसत आहे. इतरांना दिल्यानंतर आपण लस घेऊ, अशी अनेकांची भावना आहे.
कोरोना लढ्यात सर्वांत पुढे होऊन आरोग्य विभागाने काम केले. त्यामुळे सर्वांत आगोदर त्यांना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. यासाठी खाजगी व सरकारी अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची माहिती को-वीन ॲपवरून संकलित करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरांतील माहिती ९९ टक्क्यांपेक्षा जास्त संकलित झाली आहे; परंतु अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय ५८ टक्के व जिल्हा रुग्णालयाची ८० टक्केच माहिती संकलित झाली आहे. अद्यापही १०० टक्के माहिती संकलित न झाल्याने अडचणी येत असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. खाजगी आरोग्य संस्थांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावूनही अनेकांनी अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळेच जिल्ह्याचा आकडा १०० टक्के पूर्ण झाला नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आरोग्य विभागातील अधिकारी, आयएमएकडून आवाहन केले जात असतानाही अद्यापही काही कर्मचाऱ्यांच्या मनात या लसीबद्दल भीती असल्याचे दिसत आहे. लस आल्यावर प्रत्यक्षात किती लोक ही लस घेतात, हे वेळच सांगेल.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय आहे भावना
जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने मला काही त्रास नाही. त्यामुळे ही लस घेणार नाही. उगाच काही साइड इफेक्ट झाला तर काय करायचे, असे सांगितले, तर एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने अगोदर दुसऱ्यांना देऊ द्या. त्यांना काही त्रास झाला नाही, तर मी घेणार आहे, असे सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १५ हजार २६८ लोकांनी कोरोना लसीसाठी नोंदणी केलेली आहे. त्यांना लस देण्यासाठी ४१७ लोक आहेत. अद्यापही नोंदणी सुरूच आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता ही लस घ्यावी. सर्व बाजूने विचार करूनच शासनाने ही लस तयार केलेली असते. त्यामुळे काळजी करू नये.
- डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, लसीकरण मोहीम, बीड
सर्व तपासणी, चाचणी करूनच शासनाने कोरोना लसीला परवानगी दिलेली असते. त्याचे साइड इफेक्ट असले तरी ते तेवढे गंभीर नसतील. सर्व घटकांचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ही लस आली तर मी घेणार आहे आणि इतरांनीही लस घ्यावी, असे आवाहनही मी करतो.
- डॉ. अनुराग पांगरीकर, अध्यक्ष, आयएमए, बीड