कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रशासन बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:31 IST2019-11-02T17:30:05+5:302019-11-02T17:31:17+5:30
विभागीय आयुक्त केंद्रेकर, जिल्हाधिकारी पांडे, आमदार प्रकाश सोळंके यांनी तालखेड, टाकरवण शिवारात केली पाहणी

कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रशासन बांधावर
माजलगाव : मागील महिनाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे तसेच मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके नेस्तनाबूत झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माजलगाव तालुक्यातील तालखेड, टाकरवन याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, आ. प्रकाश सोळंके, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे आदी उपस्थित होते.
मागील आठवड्यात माजलगाव तालुक्यात मोठ्याप्रमाणात पाऊस झाला. त्यात माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरण 77 टक्के भरले, ही एकीकडे दिलासा देणारी बाब असली तरी शेतकऱ्यांचे मात्र या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाताशी आलेले सोयाबीन पीक नष्ट झाले काही शेतकऱ्यांचे काढून ठेवलेले सोयाबीन जागीच नष्ट झाले तर काहींचे वाहून गेले. काढणी केलेल्या बाजरीला जागीच कोमारे फुटले तसेच कापसाच्या तर अक्षरशः झाडालाच वाती झाल्या काही ठिकाणी तर कापसाला जागेवरच करे फुटले असे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी दुपारी तालखेड, टाकरवन शिवारात केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे , तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके हे देखील याच भागात नुकसानीची पाहणी करीत होते. केंद्रेकर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते देखील त्यांच्या सोबत दाखल झाले त्यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, रमेश सोळंके, राकेश साळवे , मोहन जाधव आदी उपस्थित होते. या वेळी आयुक्त केंद्रेकर यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या तसेच पीकविमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्याचा सूचना केल्या.