‘आदित्य’मधील जिल्हा रुग्णालय येणार जुन्या इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:33+5:302021-09-04T04:40:33+5:30
बीड : कोरोनामुळे आदित्य महाविद्यालयात स्थलांतरित झालेले जिल्हा रुग्णालय आता पुन्हा जुन्या इमारतीत येणार आहे. साहित्य व रुग्ण आणण्याची ...

‘आदित्य’मधील जिल्हा रुग्णालय येणार जुन्या इमारतीत
बीड : कोरोनामुळे आदित्य महाविद्यालयात स्थलांतरित झालेले जिल्हा रुग्णालय आता पुन्हा जुन्या इमारतीत येणार आहे. साहित्य व रुग्ण आणण्याची कारवाई सुरू झाली असून येत्या आठवडाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जुन्या इमारतीतच कोरोनाबाधित, संशयित व इतर सामान्य रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्यांना कोरोनाचा धोका होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
मागील दीड वर्षांपूर्वी कोरोनाबाधित व संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत राखीव ठेवण्यात आली होती. आता रुग्णसंख्या कमी झाली तसेच ‘आदित्य’मध्ये जाण्यासाठी सामान्यांचे हाल होत होते. त्यामुळे हे रुग्णालय परत जुन्या इमारत आणण्याची मागणी जोर धरू लागली होती. आ. संदीप क्षीरसागर यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. याला आता यश आले असून येत्या आठवडाभरात ‘आदित्य’मधील सर्व विभाग पुन्हा जुन्या इमारतीत आणण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
--
कोठे काय असणार
जिल्हा रुग्णालयात ३२० खाटा आहेत. त्यातील फिवर क्लिनिक, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये आयसीयू, व वॉर्ड ७ ते ९ येथील १५० खाटा कोरोनाबाधित व संशयितांसाठी तर वॉर्ड क्रमांक २ ते ५, एनआरसी अशा १७० खाटा नॉन कोविड रुग्णांसाठी ठेवल्या आहेत तसेच एसएनसीयू विभाग हा तिसऱ्या लाटेतील बालकांसाठी राखीव ठेवला आहे. प्रसुती विभागही जुन्याच जागेत राहील. ओपीडीचे सर्व विभाग प्रशासकीय इमारतीत राहणार आहेत. प्रशासनाचे काही विभाग नर्सिंग महाविद्यालयाकडे हलविले आहेत. शस्त्रक्रियागृह, डोळ्यांचा वॉर्डही कार्यान्वित केला आहे.
--
आदित्यमधील सर्व विभाग आता जुन्या ठिकाणी आणले जाणार आहेत. आठवडाभरात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. ओपीडी, आयपीडी, प्रसुती, शस्त्रक्रिया गृहाची व्यवस्था केली आहे तसेच कोरोनाबाधित, संशयित व इतर सामान्यांचा संपर्क येणार नाही, यासाठी स्वतंत्र वॉर्ड आणि यंत्रणा तयार केली आहे. जागा थोडी अपुरी आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
030921\03_2_bed_15_03092021_14.jpeg
रूग्णालय स्थलांतर करण्यापूर्वी सर्व आढावा घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे. सोबत संगीता दिंडकर, डॉ.रामेश्वर आवाड, गणेश पवार आदी.