- मधुकर सिरसट केज (बीड) : बेरोजगारीला कंटाळून एका 34 वर्षीय तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील काळेगावघाट येथे सोमवारी दुपारी घडली. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काळेगावघाट येथील दयानंद हरिश्चंद्र गाताडेने डी.एडचे शिक्षण घेतले होते . तो मागील काही वर्षांपासून शिक्षकाच्या नोकरीच्या शोधात होता. पण नोकरी मिळत असल्याने तो हताश झाला होता. शेवटी बेरोजगारीला कंटाळून दयानंदने टोकाची भूमिका सोमवारी दुपारी घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
माहिती मिळताच जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला. मंगळवारी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश रामचंद्र गाताडे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.