'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:28 IST2024-12-28T15:28:24+5:302024-12-28T15:28:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन १९ दिवस उलटले, पण अजूनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान, आज बीड मध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्व पक्षातील आमदारांची उपस्थिती होती. या मोर्चात वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी झाली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. गेली चार वर्षे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुंडे यांनी भाड्याने दिले होते अशी टीका केली.
आक्रोश मोर्चात बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या होऊन १९ दिवस झाले पण अजूनही काही आरोपींना अटक झालेली नाही. काही आरोपी मोकाटच आहेत. खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनाही अटक झालेली नाही. गेली चार वर्षे धनंजय मुंडे पालकमंत्री होते. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री भाड्याने दिले. कोणाला दिले तर वाल्मिक कराड यांना दिले, असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.
"पालकमंत्र्यांचे त्यांना अधिकार मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस प्रशासन आणि प्रशासनावर जरब बसवली. फोन करुन पोलिस ठाण्यात कुणालाही अडकवायला सांगायचं. हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले. परळी तालुक्यात गोदावरी नदीतून दररोज ३०० हायवा वाळूचा उपसा करतात. या हायवा कोणाच्या आहेत? या सर्व गोष्टीला ज्यांनी वाल्मिक कराड यांच्या पाठिमागे शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे जर सरकारमध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही म्हणून या निमित्ताने मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा तपास होईपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं, अशी मागणीही सोळंके यांनी केली. आजचा मोर्चा हे आमचं पहिलं पाऊल आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर या पेक्षा मोठं आंदोलन कराव लागणार आहे, असंही सोळंके म्हणाले.