१५ हजारांची लाच मागितली; दोन खासगी अभियंता पकडले, नगर रचनाकार फरार
By सोमनाथ खताळ | Updated: May 22, 2024 18:35 IST2024-05-22T18:29:53+5:302024-05-22T18:35:18+5:30
बीड एसीबीची कारवाई, ऑनलाईन प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी मागितली लाच

१५ हजारांची लाच मागितली; दोन खासगी अभियंता पकडले, नगर रचनाकार फरार
बीड : पोर्टलवर आलेला ऑनलाईन प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी येथील प्रभारी नगर रचनाकाराने ३० हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रूपयांची लाच खासगी अभियंत्याकडे देण्यास सांगितले. याप्रकरणी दोन खासगी अभियंत्यांना एसीबीने पकडले. तसेच नगररचनाकार फरार आहे. या तिघांविरोधातही बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
प्रशांत शिवाजी डोंगरे (वय २९ रा. चऱ्हाटा फाटा, बीड) हा सहायक नगर रचनाकार असून त्याच्याकडे सध्या नगररचनाकार या पदाचा अतिरिक्त पदभार होता. तसेच निलेश सोपान पवार (वय २९, रा. आंतरवली बुद्रुक ता. गेवराई) हा अभियंत्याचा मदतनीस असून शेख नेहाल शेख अब्दुल गणी (वय ३०्र रा.शहेंशाह नगर, बीड) हा अभियंता आहे. तक्रारदाराचे येळंबघाट शिवारातील गट क्रमांक ५८० अ (१) मधील २०.५० आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज बीपीएमएस पोर्टलवर निलेश पवार याच्या मार्फत दाखल केला होता.
बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी तो नगर रचना कार्यालयात पाठविला. २६ मार्च निलेश याने प्रशांत डोंगरे याच्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. २ एप्रिल रोजी याची पंचासमक्ष खात्री करण्यात आली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी डोंगरेने देखील लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपयांची लाच शेख नेहाल याच्याकडे देण्यास सांगितली. याप्रकरणी निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेतले. तर डोंगरे हा फरार आहे.
या तिघांविरोधातही बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, हनुमान गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, गणेश मेहेत्रे आदींनी केली.