Demand for papaya from Beed district in Delhi; 13 lakh from papaya planted in four acres | बीड जिल्ह्यातील पपईला दिल्लीत मागणी; चार एकरांतील पपईतून १३ लाखांची बक्कळ कमाई

बीड जिल्ह्यातील पपईला दिल्लीत मागणी; चार एकरांतील पपईतून १३ लाखांची बक्कळ कमाई

ठळक मुद्देदहा महिन्यात या फळबागेवर २ लाख ५०  हजार रुपये खर्च केला.सर्व खर्च जाऊन १० लाख रूपये निव्वळ नफा

माजलगाव : तालुक्यातील लवुळ येथील शेतकरी हनुमान शिंदे यांच्या शेतातील पपईला दिल्ली येथून मागणी आल्यामुळे या पपईला चांगला भाव मिळाला. त्यामुळे चार एकरात या शेतकऱ्याला १३  लाखांचे उत्पन्न मिळाले.

माजलगाव तालुक्यातील लवुळ येथील शेतकरी हनुमान उर्फ बाळासाहेब राधाकिशन शिंदे यांची शेती लवुळ - परडी माटेगाव या रस्त्यावर असून तेथे त्यांनी जानेवारीमध्ये  चार एकरात ४ हजार झाडांची पपईची फळबाग केली. दहा महिन्यात या फळबागेवर त्यांनी २ लाख ५०  हजार रुपये खर्च केला. या दरम्यान चांगला पाऊस झाल्याने या झाडांना फळे जास्त प्रमाणात लागली. या एका फळाचे वजन हे चार किलोपर्यंत भरले. 

ताईवान ७८६ या जातीची पपई अत्यंत गोड असून खायला पण दर्जेदार लागत असल्याने या पपईला दिल्ली , मुंबई ,हरियाणा या भागातून चांगली मागणी असते. हनुमान शिंदे यांच्या पपईला दिल्लीतून  मागणी आली. या पपईला जागेवर १२-१३ रूपये भाव मिळाल्याने त्यांना चार एकर शेतात जवळपास १३  लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. सर्व खर्च जाऊन १० लाख रूपये निव्वळ नफा मिळाल्याने या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले.
यापूर्वी या शेतकऱ्याने सीताफळ, मोसंबी ,टरबूज आदी फळबागा केल्या मात्र  कमी खर्चात जास्त उत्पन्न पपई या फळबागेत मिळाल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. या पपईच्या बागेतून आणखी उत्पन्न मिळविणार असल्याचे हनुमान शिंदे यांनी सांगितले.

आमच्या पपईला १५-१६ रूपयांपर्यत भाव अपेक्षित होता परंतु सर्वच ठिकाणी पपईचे उत्पादन चांगले असल्याने आम्हाला भाव कमी मिळाला. असे असले तरी आम्हाला मिळालेल्या भावात  समाधान मिळाले. या भागातील शेतकऱ्यांनी कापूस ,ऊस या पिकांच्या पाठीमागे न लागला कोणतीही फळबाग लागवड करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.     
- हनुमान शिंदे, पपई उत्पादक शेतकरी

Web Title: Demand for papaya from Beed district in Delhi; 13 lakh from papaya planted in four acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.