Chhagan Bhujbal on Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं असून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. यातून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात यावं अशी मागणी सातत्याने होत आहेत. मात्र याबाबत बोलताना विनाकारण माझा राजीनामा मागितला जातोय अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंचे समर्थन करत त्यांचा या प्रकरणामध्ये हात नसल्याचे म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
"मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा तरी राजीनामा घ्यावा असं माझ्या मनात येणं शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि जर त्याच्यामध्ये जर कोणी दोषी सापडलं तर त्या सगळ्यांवर कारवाई करू. त्या अगोदरच आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागतो आहोत. चौकशीतून काही बाहेर आलं आहे का? तुमच्याकडे काही माहिती असेल तर पोलिसांना द्या. जोपर्यंत कन्फर्म होत नाही की धनंजय मुंडे यांचा या प्रकरणांमध्ये हात आहे तोपर्यंत त्यांनी का राजीनामा द्यावा? साप साप म्हणून भुई थोपटणे योग्य नाही. अशा प्रकरणातून मी सुद्धा गेलो आहे," असं छगन भुजबळ म्हणाले.
"धनंजय मुंडे यांचा या प्रकरणामध्ये हात कुठे आहे. तसं काही सिद्ध झालेलं नाही. जर तुमच्याकडे माहिती असेल तर त्यांना द्या. मला वाटतं की कुणावर अन्याय होता कामा नये. दोशीला शिक्षा झाली पाहिजे," असंही छगन भुजबळ म्हणाले.
खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक - सुरेश धस
सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला. पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी मुंडेंच्याच बंगल्यावर बैठक झाली होती. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे सुरेश धस यांनी केला.