बँकेकडून अनुदान वर्ग होण्यास विलंब, निराधारांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:54+5:302021-04-11T04:32:54+5:30
किल्ले धारूर : येथील तहसील कार्यालयातील निराधार योजना विभागाने दोन टप्प्यात श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या ...

बँकेकडून अनुदान वर्ग होण्यास विलंब, निराधारांची तारांबळ
किल्ले धारूर : येथील तहसील कार्यालयातील निराधार योजना विभागाने दोन टप्प्यात श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींचे ५० लाख २२ हजार ५०० रुपये अनुदानाचा धनादेश देऊन एक महिना झाला तरी निराधारांच्या खात्यावर पैसे वर्ग न केल्याने या निराधारांवर उपासमारीची पाळी येत आहे. हे अनुदान तत्काळ वितरीत करावे अशी मागणी होत आहे.
धारूर शहर व खेड्यातील श्रावणबाळ निराधार योजनेमधील व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे दहा महिन्यांच्या अनुदानापोटी तहसील कार्यालयाने मार्चमध्ये दोन टप्प्यात अनुदानाचे धनादेश तेलगाव एस. बी. आय. शाखेत जमा केले. ही रक्कम ५० लाख २२ हजार ५०० रुपये आहे. जवळपास दोन हजार लाभार्थीचे हे अनुदान आहे. मात्र, बँकेने मार्चअखेरची कामे सुरू असल्याच्या नावाखाली निराधारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचे टाळले. निराधार लाभार्थी आधीच एक वर्षापासून अनुदानापासून वंचित आहेत. तर आणखी दोन महिन्यांचे अनुदान पाठविण्याच्या तयारीत तहसील कार्यालय आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळ व निराधारांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ निराधारांचे अनुदान वितरीत करावे, अशी मागणी होत आहे.
एक दिवसात अनुदान वितरण होईल
निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानाचे दोन वेळा धनादेश आले. एक वेळाचे अनुदान खात्यावर जमा आहे. दुसऱ्यावेळी आलेले अनुदान सोमवारी जमा होईल - अनिल पटेल, शाखा व्यवस्थापक, एसबीआय, तेलगाव.