आरटीई ऑनलाईन प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:38+5:302021-07-02T04:23:38+5:30
बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली ...

आरटीई ऑनलाईन प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील निवड झालेल्या बालकांची ११ जूनपासून प्रवेश प्रकिया सुरू झाली होती. यासाठी ३० जूनपर्यंत मुदत होती.
आरटीई प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे त्यांनी ०९ जुलै २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
आरटीई प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर क्लिक करून प्रवेशाचा दिनांक पाहावा. प्रवेशाकरिता एसएमएसद्वारे पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
पालकांनी प्रवेशाकरिता प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थितीवर क्लिक करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे. फक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांनीच अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे, बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि सोशल मीडिया, ई-मेल किंवा अन्य माध्यमाद्वारे बालकांच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. आपल्या पाल्याचे शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर होऊ शकतो प्रवेश रद्द
विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
पालकांनी अर्ज भरताना निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे, त्याच पत्त्यावर गुगल लोकेशनमध्ये रेड बलून दर्शविणे आवश्यक आहे. लोकेशन आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. जर एकाच पालकांनी २ अर्ज भरून त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.
प्रतीक्षा यादीतील पालकांनी शाळेत जाऊ नये.
प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, उर्वरित रिक्त जागा करिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच प्रिंट काढावी. त्यांच्यासाठी आरटीई २५ टक्के पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत.
----------
तांत्रिक कारणांमुळे प्रवेशाला विलंब
सोडतीमध्ये निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यास विलंब होऊ लागला. त्यामुळे निवड यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी सूचित केले आहे.
----------
बीड जिल्हा आरटीई प्रवेश संक्षिप्त
शाळा - २३३
जागा- २,२२१
आलेले अर्ज - ३,९३८
निवड - २,०१२
तात्पुरते प्रवेश - ९३०
निश्चित झालेले प्रवेश - ४४२
-------------