दाटे कंठ लागे डोळीया पाझर... प्रस्थान सोहळा एक दिवसावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:23+5:302021-07-02T04:23:23+5:30
शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा आणि वारकऱ्यांची महापर्वणी म्हणजे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्ञानोबा, तुकोबा, आदी संतांसमवेत चालत ...

दाटे कंठ लागे डोळीया पाझर... प्रस्थान सोहळा एक दिवसावर
शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा आणि वारकऱ्यांची महापर्वणी म्हणजे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्ञानोबा, तुकोबा, आदी संतांसमवेत चालत जाणे. हा वारसा पिढ्यान्पिढ्या चालविणाऱ्या निष्ठावान वारकऱ्यांचा प्रस्थान सोहळा एक दिवसावर आल्याने घालमेल होत आहे. यंदाही पायी वारी होत नसल्याच्या वेदना सहन होत नसून ‘दाटे कंठ लागे डोळीया पाझर’ अशी व्यथा वारकरी व्यक्त करीत आहेत.
अवघ्या जगाचे लक्ष बनून राहिलेला ज्ञानोबा-तुकोबांचा पालखी सोहळा आता अवघ्या चार दिवसांवर आला असल्याने वारकऱ्यांना वारीचे डोहाळे लागले आहेत; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे यात मोठा अडथळा निर्माण झाला असून, शासनाने पायी वारीवर निर्बंध घातले. मोजक्याच उपस्थितीत आणि तेदेखील एस. टी.ने पालखी सोहळ्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. लाखो भाविकांसमवेत टाळ, मृदंग आणि अभंग म्हणत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कुठल्याही निमंत्रणाशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंदलहरींची अनुभूती वारकरी घेत असतो; परंतु गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वारी चुकली जात असल्याने डोळ्यांच्या कडा विरहाश्रूंनी ओल्या होत आहेत. दोन वर्षांपासून वळकटी अडगळीलाच पडली आहे.
जीवनातील अत्युच्च आनंदाची अनुभूती माउलीसोबत केलेल्या पायी वारीतून मिळते. साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या भेटीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. असा सच्चिदानंद वारीत गेल्यावरच मिळतो. मात्र या आनंदाला आता पारखे झाल्याचे दुःख असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय परदेशी म्हणाले.
माझ्या वडिलांनंतर पालखी सोहळ्यातील दिंडी क्र. १२५ संत महादेव कासार दिंडी व्यवस्था जबाबदारी सांभाळत असून, चार माणसांच्या कुटुंबात न मिळणारा आनंद चारशे वारकऱ्यांचे एक कुटुंब या वारीच्या कालावधीत जे समाधान देते, ते शब्दांत नाही सांगता येत; परंतु दोन वर्षे झाली, या सेवेला आम्ही पारखे झालो, असे दिंडीचालक गिरीश अंभोरे यांनी सांगितले.
तालुक्यातील रायमोहा येथील नारायण महाराज डिसले यांच्यासोबत सुमारे ३५० ते ४०० वारकरी पालखी सोहळ्यात जात. मात्र गेल्या वर्षी आणि या वर्षीदेखील या पारमार्थिक आनंदावर कोरोनाने विरजण टाकले आहे. पुढच्या वर्षी तरी आमचा असा अव्हेर करू नको, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे करतो, असे नारायण महाराज डिसले यांनी सांगितले.