सोयाबीन पिकांना चक्रीभुंगा खोडमाशीचा धोका - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:12+5:302021-07-24T04:20:12+5:30
बीड : खरीप हंगामात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ओढ दिल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात ...

सोयाबीन पिकांना चक्रीभुंगा खोडमाशीचा धोका - A
बीड : खरीप हंगामात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ओढ दिल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती, तर पावसाच्या ओढीने पिकांची वाढदेखील खुंटली आहे. यावर्षी दरवर्षीपेक्षा सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला असून, या पिकांवर चक्रीभुंगा व खोडमाशीचा प्रदुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
कृषी विभागाकडून जिल्हाभरात पिकांवरील कीड, रोग, अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसमोर दरवर्षी बोंडअळी रोखण्याचे आवाहन आहे. ज्या महसूल मंडळामध्ये अधिक प्रमाणात बोंडअळी, फुलकिडे तसेच शेंगातील अळीचा व चक्रीभुंगे व खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज व्यक्त करत त्याठिकाणी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांनी फवारणी करताना औषधांचे प्रमाण, मिश्रण कसे करावे आदींविषयी गावागावांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. चक्रीभुंगा किंवा खोडमाशी पिकाच्या पानातील रस शोषून घेतल्यामुळे पिकाची वाढ खुंटते. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे, तर काही परिसरात दररोज रिमझिम सुरू आहे. त्यामुळे फवारणीवर झालेला खर्च वाया जातो काय? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा खोडमाशी व शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकऱ्यांनी पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करून त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच कीटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय केले तर चक्रीभुंगा व खोडमाशीसह इतर किडींचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चक्रीभुंग्याचा प्रदुर्भाव झाल्यास पिकाच्या फांद्या वाळतात झाड जळून जाते. त्यामुळे असा प्रादुर्भाव दिसल्यास शेतकऱ्यांनी चक्रीभुंग्यांनी अंडी घालू नये यासाठी पाच टक्के लिंबोळी अर्काची फवारणी करावी. पेरणीच्या ३० ते ३५ दिवसांनंतर प्रादुर्भाव दिसातच ७ ते १० दिवसांत ट्रोयझोफॉस ४० ईसी १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एसी १५ मिली १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एसी ३ मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के तसेच लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ झेड.सी. २.५ ग्रॅ. प्रति ग्रॅ १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
खोडमाशीमुळे होते उत्पादनात खोडमाशी सोयाबीनची पाने खातात त्यानंतर झाडाच्या खोडात शिरून ती पोकरतात. त्यामुळे सोयाबीन पिकावर इथिनॉल ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के ६.७ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस किंवा इतर कोणत्याही पिकांवर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर संबंधित कृषी सहायकाशी संपर्क करावा. सर्व मागदर्शन कृषी विभागाकडून दिले जाईल. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जनजागृतीदेखील केली जात आहे.
-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड
पीक क्षेत्र
सोयाबीन २ लाख ६७ हजार हेक्टर
कापूस १ लाख ५८ हजार हेक्टर
220721\505622_2_bed_21_22072021_14.jpg
शेतात फुललेले सोयाबीनचे पीक