वन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:21+5:302021-07-02T04:23:21+5:30
अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल ...

वन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान
अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल नष्ट होऊ लागले. याचा परिणाम जंगलातील वन्यप्राण्यांवर, पशूंवर होत आहे. त्यांना जंगलात सर्व अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा आता जंगल सोडून शेतात व गावाकडे वळविला आहे. त्यामुळे शेतातील पिकांसह मानवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे, तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला. यामुळे खरिपाच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात सोयाबीन, ऊस, संकरित ज्वारी, तूर, जवस, उडीद, मूग, अद्रक, बटाटा ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्यप्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरणांचे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणांच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, पिवळा या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे.
रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाण्यासाठीही शेतकरी धजावत नाहीत. तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एका महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.
रानडुक्कर अथवा वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.
दीड एकर ऊस फस्त
माझ्या शेतातील दीड एकर ऊस रानडुकरांनी फस्त केला आहे. अजूनही नुकसान सुरूच आहे. मोठा खर्च करून उसाची लागवड केली; मात्र या वन्यप्राण्यांमुळे शेती धोक्यात आली आहे. याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा.
हनुमंत जगताप, शेतकरी, राडी.
उसाचे पीक संकटात
अंबाजोगाई तालुक्यात ग्रीनबेल्ट समजल्या जाणाऱ्या आपेगाव, राडी व धानोरा सर्कल परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या परिसरात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. वनविभाग व प्रशासनाने रानडुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.
अशोक कदम, शेतकरी, तडोळा.