वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी ग्राहकास तगादा A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:20+5:302021-07-02T04:23:20+5:30
गेल्या पंधरा महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन राहिले नाही. त्यामुळे स्वामी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यातच ...

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी ग्राहकास तगादा A
गेल्या पंधरा महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन राहिले नाही. त्यामुळे स्वामी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यातच मे महिन्यात शनिमंदिराचे पुजारी किशोर स्वामी यांचे निधन झाले. त्यांच्याच घराचा वीजपुरवठा थकबाकी न भरल्याने मंगळवारी खंडित करण्यात आल्याने स्वामी कुटुंब अंधारात आहे.
किशोर स्वामी यांचे बंधू योगेश स्वामी हे वीज बिल भरण्यासाठी बिलाचे टप्पे पाडून द्यावे म्हणून येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी थांबून होते. बुधवारीही वीजपुरवठा जोडला नव्हता. दरम्यान, मंगळवारी एका वीज कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची तक्रार योगेश स्वामी यांनी केली आहे.
शहरातील हनुमान नगर भागातील लताबाई विश्वनाथ स्वामी यांच्या नावाने वीज मीटर असून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव किशोर स्वामी यांचे गेल्या महिन्यात लातूर येथे उपचार चालू असताना निधन झाले. किशोर स्वामींच्या उपचारासाठी परळी, लातूर येथे दवाखान्यात मोठा खर्च झाल्याने त्यांना वीज बिल भरणे शक्य झाले नव्हते. लताबाईंचे दुसरे चिरंजीव महेश व योगेश हे पण वैद्यनाथ मंदिरात पौरोहित्याचे काम करतात; परंतु मंदिर बंद असल्याने त्यांनाही उत्पन्नाचे साधन नाही. विश्वनाथ स्वामी हे बेलवाडी मठात सेवा करतात. त्यांच्यावरच स्वामी कुटुंबांचा कसाबसा संसाराचा गाडा चालू आहे.
मंगळवारी सकाळी वीज वितरण कंपनीच्या पाचजणांचे एक पथक स्वामी यांच्या घरी आले अन् पैसे भरा नाही तर तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे सांगून गेले.
योगेश स्वामी बुधवारी वीज वितरण कंपनीत गेले असता पहिल्यांदा त्यांना प्रतिसाद न देता सर्व ३५ हजार बिल भरावे लागेल, असे सांगितले. त्यांनी अधिकाऱ्यांना अडचण सांगितली तरी त्यापैकी २५ हजार भरावे लागतील, असे शाखा अभियंत्याने सांगितले.
ज्यांची आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही व त्यांच्या घरात कोरोना अथवा अन्य कारणाने एखाद्याचे निधन झाले असेल अशा कुटुंबास वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज बिल भरण्यासाठी तगादा लावू नये किंवा त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अशा कुटुंबांना वीज बिल भरण्यासाठी टप्पे पाडून द्यावेत.
-अश्विन मोगरकर, भाजपा कार्यकर्ता.
परळी येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोरोना स्थितीतही वीज वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे दोन महिने आमचे झेरॉक्स सेंटर बंद होते. वीज कर्मचारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत, अशा छोट्या दुकानदारांनाही लाईट बिल भरणे शक्य होत नाही, वेळ वाढवून द्यावा.
- प्रकाश चाटूफळे, झेरॉक्स सेंटर चालक, परळी.