Video: इंग्रजीत ईमेल आयडी मागितल्याने वाद, संतापलेल्या ग्राहकाची बँक अधिकाऱ्याला मारहाण
By अनिल भंडारी | Updated: April 12, 2023 19:44 IST2023-04-12T19:43:32+5:302023-04-12T19:44:31+5:30
ग्राहकासह चौघांवर गुन्हा दाखल

Video: इंग्रजीत ईमेल आयडी मागितल्याने वाद, संतापलेल्या ग्राहकाची बँक अधिकाऱ्याला मारहाण
बीड : खाते उतारा देण्यासाठी इंग्रजीतून ई मेल आयडी मागितल्याने झालेल्या वादावादीत येथील महाराष्ट्र बँकेच्या उप व्यवस्थापकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी नवनाथ शिराळे, कृष्णा शिराळे व इतर दोघांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील साठे चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्राहक नवनाथ शिराळे हे गेले होते. तेथे उप व्यवस्थापक रामप्रसाद गंगाराम येवले यांच्याकडे शिराळे यांनी त्यांच्या खात्याचा उतारा मागितला. खाते उताऱ्यासाठी येवले यांनी ई मेल आयडी मागितला. शिराळे यांनी मराठीमध्ये ई मेल आयडी दिला. त्यावेळी उप व्यवस्थापक येवले यांनी इंग्रजीमध्ये ई मेल आयडी द्या, मराठीत चालत नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने येवले यांना शिवीगाळ करण्यात आली. शिवीगाळ का करता? अशी विचारणा येवले यांनी करताच नवनाथ शिराळे, कृष्णा शिराळे व इतर दोघांनी संगनमत करून लाथाबुक्क्यांनी व चापटाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामकाजात अडथळा आणला, अशी फिर्याद येवले यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.