अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:26 PM2020-01-01T23:26:06+5:302020-01-01T23:26:54+5:30

३१ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल ३ दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.

In the custody of the unarmed robber police | अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देकेज, अंबाजोगाईहून अटक : १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासह इतर दरोड्यांचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून देखील संशय आलेल्या ठिकाणी कसून तपास केला जात होता. ३१ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल ३ दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे इतर गुन्हे देखील उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वसीमखान अफजलखान पठाण (रा. हत्तीखाना, बीड), उमेर उर्फ पापा मुश्ताक फारोकी (रा. रोजामोहल्ला, केज), अक्षय उर्फ चिंटू मिठू गायकवाड (रा. पात्रूड गल्ली, बीड) असे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त वार्ताहरामार्फत यांनी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी केज, अंबाजोगाई भागात या आरोपींचा शोध घेत होते.
यावेळी उमेर उर्फ पापा मुश्ताक फारोकी हा चोरीची दुचाकी (एमएच २३ झेड २६६७) वर बसून केज बसस्थानकात आला. हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ कारवाई करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले.
त्यानंतर वसीमखान अफजलखान पठाण, अक्षय उर्फ चिंटू मिठू गायकवाड हे दोघे अंबाजोगाई येथे कारखाना परिसरात लपून बसले होते. त्या ठिकाणी पोलीस तपासासाठी गेले असता याची भनक लागल्याने दोन्ही आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ४३ इंच दूरदर्शन संच व दुचाकी (एमएच १६ सीके ५०८३) जप्त केली.
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील विप्रनगर भागात देखील घरफोडी केल्याची कबुली दिली.
पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप अधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप, बालाजी दराडे, भास्कर केंद्रे, जयसिंग वाघ, शेख सलीम, मुंजाबा कुव्हारे, साजेद पठाण, सतीश कातकडे, सखाराम पवार, रामदास तांदळे, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, आसेफ शेख, सिद्दीकी, चालक हारके, हराळे यांनी केली.
तिन्ही आरोपींवर डझनभर गुन्हे दाखल
अटक केलेले आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, अहमदनगर यासह इतर जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
अक्षयवर ४८, वसीमवर २७, तर उमेरवर ८ गुन्हे दाखल आहेत. आरोपींना अटक झाल्याने विविध ठिकाणी अशा प्रकारे घडलेल्या इतर गुन्ह्यांची माहिती तपासादरम्यान त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: In the custody of the unarmed robber police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.