ढगाळ वातावरणामुळे ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:24+5:302021-01-09T04:28:24+5:30
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार ...

ढगाळ वातावरणामुळे ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार असून, उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. रब्बी हंगामातील ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावर्षी चांगला पाऊस खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. मात्र, आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. यामध्ये हरभरा, गहू व ज्वारी या पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव तसेच घाटे अळी तसेच रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट देखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात जेणेकरून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल तसेच विविध प्रकारची फवारणी करून उपाययोजना केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.
सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू
रब्बी हंगामात यावर्षी ज्वारी १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टरवर पेरा आहे. तर, त्याखालोखाल हरभरा १ लाख ३८ हजार ६७ हेक्टर तर, ३३ हजार हेक्टरवर गहू या पिकाचा पेरा करण्यात आला आहे. इतर क्षेत्रावर मका व भाजीपाला आहे.
या कराव्यात उपाययोजना
हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर, प्रत्येक रोपावर २ ते ३ आळ्या आढळल्यास नियंत्रण करणे गरजेचे आहे. यामध्ये ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एन.पी.व्ही.२५० मिली प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच क्लोरोपायरिफॉस २० ईसी, क्विनॉफॉस २५ ईसी, इमामेक्टीन बेंजोएट ५ एसी यापैकी एका औषधाची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने करावी. मावा किडीच्या किंवा चिकटा नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ईसी १.५ मिलि. प्रति लिटरपाणी याप्रमाणे फवारणी करावी अशी माहिती आष्टीचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.सुपेकर यांनी दिली.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी फवारणीचा सल्ला घेण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, त्यांना देखील शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणी माहिती देण्यास टाळाटाळ केली तर त्यांची तक्रार कृषी अधीक्षक कार्यालयात करावी.
-सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी) बीड