नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द
By सोमनाथ खताळ | Updated: January 8, 2025 12:05 IST2025-01-08T12:04:17+5:302025-01-08T12:05:28+5:30
पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द
बीड : एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगाराच्या कंबरेलाही परवानाधारक बंदूक होती. परंतु, हाच प्रकार 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर पोलिसांनी पत्र पाठविले. यामध्ये मंगळवारी तब्बल १०० परवाने निलंबित आणि रद्द करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले, त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना रद्दच्या कारवाईला वेग दिला आहे.
जिल्ह्यात एक हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. प्रत्येक परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती घेतली जाते; परंतु मागील काही वर्षांत पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळेच राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या संगनमताने अगदी चने, फुटाण्याप्रमाणे परवाने देण्यात आले. हा आकडा पाहिल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या सर्वांची यादी बनवली. गुन्हे दाखल असलेल्या २४५ व्यक्तींची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. त्यानंतर यात छाननी केल्यावर २३२ जणांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावले. खुलासा असमाधानकारक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत १०० प्रस्ताव रद्द केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
अधिवेशनातही गाजला मुद्दा
६ डिसेंबर २०२३ रोजी 'लोकमत'ने सर्वांत अगोदर 'चोरच झाले शिरजोर, गुन्हेगारांच्या कंबरेलाच परवानाधारक पिस्टल' असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर हिवाळी अधिवेशन झाले. यात भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी शस्त्र परवान्याचा विषय उपस्थित केला. सत्ताधारी, विरोधी आमदारांसह अंजली दमानिया यांनीही हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर आता परवाना रद्दच्या कारवाया सुरू झाल्या आहेत.
परळीत हवेत गोळीबार, त्यांची बंदूक काढली
परळीत कैलास बाबासाहेब फड, माणिक मुंडे आणि जयप्रकाश सोनवणे यांनी हवेत गोळीबार केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तसेच या तिघांचाही परवाना आता रद्द झाला आहे.
३०३ प्रस्ताव नाकारले
जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याआधी पोलिसांकडून त्याची खातरजमा केली होती. हे सर्व करून २०२४ या वर्षात पाठविलेले ३०३ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून नाकारण्यात आले आहेत.
२३२ प्रस्तावांवर होणार निर्णय
तत्कालीन अधीक्षक अविनाश बारगळ यांनी २४५ प्रस्ताव पाठविले होते. त्यात छाननी होऊन २३२ राहिले. त्यापैकी १०० प्रस्ताव मंगळवारी निलंबित व रद्द करण्यात आले. उर्वरित १३२ प्रस्तावांवरही कारवाई सुरूच आहे.
अशी आहे आकडेवारी
एकूण शस्त्र परवाने - १२८१
रद्दचे प्रस्ताव पाठविले - २४५
छाननीत वगळले - १३
गुन्हे दाखल असतानाही परवाना
१ गुन्हा असलेले - १५५
२ गुन्हे असलेले ४०
३ गुन्हे असलेले २०
४ गुन्हे असलेले १७
५ गुन्हे असलेले ३
६ गुन्हे असलेले ५
९ गुन्हे असलेला १
१० गुन्हे असलेला १
१२ गुन्हे असलेला १
१४ गुन्हे असलेला १
१६ गुन्हे असलेला १