दुःखी, कष्टी लोकांना आनंद मिळावा म्हणून नाट्यकलेची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:46+5:302021-03-13T04:59:46+5:30
बीड : दुःखी व कष्टी लोकांना आनंद मिळावा म्हणून नाट्यकलेची निर्मिती झाली. देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांना कळतील असे वेद निर्माण ...

दुःखी, कष्टी लोकांना आनंद मिळावा म्हणून नाट्यकलेची निर्मिती
बीड : दुःखी व कष्टी लोकांना आनंद मिळावा म्हणून नाट्यकलेची निर्मिती झाली. देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांना कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर ब्रम्हदेवाने ' नाट्यवेद ' नावाचा पाचवा वेद निर्माण केला आणि भरतमुनींना त्याचा प्रसार पृथ्वीवर करण्यास सांगितले. यालाच भरतमुनींचे नाट्यशास्त्र म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन संस्कार भारती देवगिरी प्रांताचे साहित्य विद्या प्रमुख डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांनी केले.
भरतमुनी जयंतीनिमित्त संस्कार भारतीच्यावतीने येथील स्वा. सावरकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ.पाटांगणकर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर तर व्यासपीठावर ज्येष्ठ रंगकर्मी व संस्कार भारतीचे पूर्व महामंत्री कुलदीप धुमाळे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर उपस्थित होते.
प्रारंभी भरतमूनींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. पाटांगणकर म्हणाले, ‘ब्रम्हदेवाने सर्वसामान्यांना समजतील असे वेद निर्माण करण्यास सांगितल्यानंतर ब्रम्हदेवाने त्यात ऋग्वेदातील पाठ्य, यजुर्वेदातील अभिनय, सामवेदातील गायन आणि अथर्ववेदातील रस यांचा समावेश करीत नाट्यवेद या पंचमवेदाची निर्मिती केली. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर ब्रम्हदेवाने भरतमुनींना त्याचा पृथ्वीवर प्रसार करण्यास सांगितले. शिवाने भरतमुनींचे नाट्य बघून आपला शिष्य तंडू यांस भरतमुनीस नृत्याचे अधिकृत कथन करण्यास पाठविले आणि या सिद्धांताचा समावेश त्याने तांडव लक्षण या सदरात केला आहे. भरतमुनींनी शरीराच्या दहा मुद्रांचा, मानेच्या व हातांच्या छत्तीस तर डोक्यांच्या तेरा मुद्रांचा समावेश केला. नृत्यातील वेगवेगळ्या शाखांनी या मूळ सिद्धांताचा वापर करून व त्यास फुलवून त्याची कंठ व वाद्यसंगीताशी एकतानता करून त्याचा एखाद्या कथेच्या कथानकाच्या सादरीकरणासाठी विस्तृत वापर केला, यालाच नाट्यशास्त्र म्हणून आज ओळख मिळाल्याचे ते म्हणाले.
यावेळी कुलदीप धुमाळे यांनी लिहिलेल्या ‘कनकालेश्वर महोत्सवाचा २४ वर्षांचा इतिहास’ या लिखाणाचे वाचन स्वतः केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे तर सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले. कार्यक्रमास डॉ.वासुदेव निलंगेकर, संस्कार भारती देवगिरी प्रांताचे प्रचार व प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे, संतोष पारगावकर, अनिल कुलकर्णी, गणेश स्वामी, महेश देशमुख, प्रा.राहुल पांडव, डॉ. कृष्णा बारटक्के, डॉ.ओमप्रकाश झंवर, प्रा.आनंद देशपांडे, सुरेश साळुंके आदी उपस्थित होते.
===Photopath===
120321\122_bed_15_12032021_14.jpeg
===Caption===
स्वा. सावरकर महाविद्यालयात संस्कार भारतीतर्फे भरतमुनी जयंतीचे आयोजन केले होते.