तलावात बुडून नवदाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:47 IST2018-11-12T00:47:08+5:302018-11-12T00:47:40+5:30

आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील तलावात नवदाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

Couple drown in lake | तलावात बुडून नवदाम्पत्याचा मृत्यू

तलावात बुडून नवदाम्पत्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील तलावात नवदाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
लहानू विलास साळुंके (२३) व छाया लहानू साळुंके (१९ रा. सारोळा शुध्दी जिल्हा अहमदनगर) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. ते आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील मोहन भिकाजी गायकवाड या आजी आजोबाकडे भेटायला आले होते. आजीला मदत व्हावी म्हणून छाया धुणे धुण्यासाठी येथून जवळच असलेल्या सोनीपठार शिवारातील तलावावर गेले होते. छायासोबत पतीही गेला होता. त्यांच्यासोबत एक लहान मुलगीपण होती. कपडे धुताना छायाचा पाय घसरून ती पाण्यात पडली. हा प्रकार लहानूने पाहिला. त्याने तात्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी खोल असल्याने आणि छायाने मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
हा सर्व प्रकार पाण्याबाहेर असलेली चिमुकली मुलगी पहात होती. हे दोघेही बाहेर येत नसल्याने ती जोरात रडू लागली. परिसरातील लोकांनी धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अंभोरा पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वीच विवाह
छाया व लहानू यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड पे्रम होते. कोठेही जाताना दोघे सोबतच असायचे. रविवारीही ते सोबतच गेले होते. छायाला वाचविताना दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढले त्यावेळी दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली दिसून आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Couple drown in lake