नकली सोन्याच्या लालसेने खरे सोने गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 08:37 PM2020-02-07T20:37:04+5:302020-02-07T20:41:57+5:30

तक्रारीवरून तिन्ही भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Counterfeit gold lure loses true gold | नकली सोन्याच्या लालसेने खरे सोने गमावले

नकली सोन्याच्या लालसेने खरे सोने गमावले

Next
ठळक मुद्देअंबाजोगाईतील घटनातीन भामट्यांवर गुन्हा

अंबाजोगाई : सोने सापडल्याचा बनाव रचून करून ते स्वस्तात देण्याच्या बहाण्याने तीन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकास फसवून त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. 

ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव रामभाऊ गित्ते (रा. तळणी, ता. अंबाजोगाई) हे खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी बसस्थानकाकडून मीनाताई ठाकरे चौकाकडे निघाले होते. यावेळी अन्य एक व्यक्तीही त्यांच्या सोबत पायी चालत होता. वाटेत एका ठिकाणी त्यांच्यासमोर एका अनोळखी व्यक्तीने रोडवर पडलेली वस्तू उचलत असल्याचा बहाणा केला आणि नघून गेला. थोड्याच वेळात आणखी एक व्यक्ती समोरून आला आणि गित्ते व त्यांच्या सोबत चालणाऱ्या अनोळखी व्यक्तीस माझे सोने रोडवर पडले होते, कोणी उचलताना पहिले का अशी चौकशी केली. एका व्यक्तीने ते सोने उचलले असून तो एका औषधी दुकानाकडे गेल्याचे गित्ते यांनी त्या व्यक्तीस सांगितल्यानंतर तो बस स्थानकाच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर थोड्याच वेळात सोने उचलणारा व्यक्ती गित्ते यांच्यासमोर आला.

यावेळी सोबत चालणाऱ्या व्यक्तीने आपण याला सापडलेले सोने बघूत असे म्हणत त्या दोघांनाही एका हॉटेलच्या बाजूला घेऊन गेला. याला सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, या गरीब माणसाला काहीतरी देऊन त्याच्याकडून बिस्कीट घेऊन अशी भुरळ त्याने गित्ते यांना घातली. त्यावर स्वतःजवळील एक अंगठी आणि गित्ते यांच्याकडील अंदाजे ३० हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या त्याने सोने सापडलेल्या व्यक्तीस दिल्या आणि त्याच्याकडून सोन्याचे बिस्कीट घेऊन गित्ते यांना दिले. पुढे जाऊन सोने वाटून घेऊत असे म्हणत ते दोन भामटे तिथून निघून गेले. त्यानंतर गित्ते यांना संशय आल्याने त्यांनी मुलास बोलावून घेत सर्व घटनाक्रम सांगितला. मुलगा आल्यानंतर दोघांनी त्या भामट्यांच्या शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. तपासणी केली असता सोन्याचे बिस्कीटही नकली निघाल्याने अखेर बाबुराव गित्ते यांनी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून तिन्ही भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Counterfeit gold lure loses true gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.