coronavirus : होय ! डॉक्टर देवच.....! कोरोना बाधितांचे उपचारानंतरचे शब्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:21 IST2020-08-25T17:18:24+5:302020-08-25T17:21:25+5:30
सीसीसीमधून उपचारानंतर परतलेल्या रुग्णांची डॉक्टरांप्रती कृतज्ञता

coronavirus : होय ! डॉक्टर देवच.....! कोरोना बाधितांचे उपचारानंतरचे शब्द !
केज : होय..! डॉक्टर देवच आहेत. त्यांनी आम्हाला धीर देऊन गत पंधरा दिवस काळजी घेतल्यानेच ठणठणीत होऊन बरे झालोत...असे उद्गार काढून केज येथील कोविड सेंटरवर कोरोनाचे उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कोरोना चाचणीत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मानसिक भीती निर्माण होते. मात्र, उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्रात गेल्यावर या रुग्णांना धीर देण्याचे काम उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, कोरोना उपचार केंद्र प्रमुख डॉ. बालासाहेब अस्वले तसेच सिस्टर व ब्रदर करीत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाटणारी भीती दूर होऊन ते कोरोनाशी दोन हात करत १५ दिवस उपचार घेऊन परतत आहेत. कोरोना उपचार केंद्रात आलेल्या अनुभवातून त्यांना डॉक्टरांमध्ये देव दिसून आल्याने, होय ् डॉक्टर देवच आहेत असे भावुक उद्गार त्यांच्या तोंडून आपसूक निघतात.
‘लोकमत’शी बोलताना कोरोनामुक्त एका रुग्णाने सांगितले की, ५ तारखेला मला कोरोना झाल्याचे निदान झाले. मी उपचारासाठी केज येथील उपचार केंद्रात गेलो. जाताना मनात भीती होती. केंद्रात गेल्यानंतर डॉ. अरुणा केंद्र, डॉ. अस्वले यांनी धीर देत आमचे मनोबल वाढवल्याने मनातून कोरोनाची भीती निघून गेली. आम्ही कोरोनाबाधित आहोत असे वाटले नाही. उपचारासाठी दाखल झाल्यापासून सुटी होईपर्यंत डॉ. केंद्रे प्रत्येक रुग्णाशी संवाद साधत वैयक्तिक चौकशी करत औषोधोपचार करीत. डॉ. अस्वले यांनी ही आमची काळजी घेत देवासारखे आमच्या सेवेत हजर राहून उपचार केले. त्यांच्या मुळेच मी कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतलो आहे. हो..डॉक्टर आमच्यासाठी देवच आहेत. ते निरोगी राहावेत म्हणून आम्ही प्रार्थनाही, असे या रुग्णाने सांगितले. उपचार घेत असताना जेवण, नाश्ता, चहा व काढा वेळेवर दिला जात होता. तसेच सकाळी व्यायाम करायला लावत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजार लपवू नका
कोरोना हा आजार उपचाराने नीट होत असल्याने नागरिकांनी आजार लपवू नये. तसेच कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत असताना होत असलेल्या त्रासाची डॉक्टराना योग्य माहिती द्या. जेणेकरून त्यांना योग्य उपचार करता येतील. कोरोना लागण झालेल्या रुग्णांनी घाबरून जाण्याची गरज नाही असेही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी ‘लोकमत’ला सांगितले.