CoronaVirus : जमावबंदीचे आदेश डावलून मस्जिदमध्ये जमलेल्या दहा जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 18:23 IST2020-03-31T18:22:50+5:302020-03-31T18:23:40+5:30
शहरातील एका मस्जिदमध्ये जमावबंदीचे आदेश डावलून सामुहिक नमाजासाठी जमलेल्या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला.

CoronaVirus : जमावबंदीचे आदेश डावलून मस्जिदमध्ये जमलेल्या दहा जणांवर कारवाई
अंबाजोगाई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भ रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तरीदेखील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे अनेक घटना उघडकीस येत आहेत. सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरातील एका मस्जिदमध्ये जमावबंदीचे आदेश डावलून सामुहिक नमाजासाठी जमलेल्या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला.
संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी अंबाजोगाई शहरातून पोलिसांची सतत गस्त सुरु आहे. सोमवारी सायंकाळी पोलिसांचे गस्तीपथक शहरातील पेन्शनपुरा भागात गेले असता त्यांना फरिद मदरसा मस्जिदमध्ये काही लोक नमाजसाठी एकत्रित आले असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मस्जिदमध्ये डोकावले असता त्यांना काही लोक संसर्ग होईल अशा पद्धतीने एकत्रित बसलेले दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांना दिली. त्यानंतर गाडे यांनी तातडीने सहा. फौजदार तुपारे, पोना. नागरगोजे यांच्यासह सदरील मस्जिदकडे धाव घेतली आणि मस्जिदमध्ये एकत्रित जमलेले कादरी ईमात गूलाम मूर्तूजा, गूलाम मूर्तूजा समदानी, खिजर अकबर हूसेन जहागीरदार, शेख फय्याज शेख रसूल, अयूबखान मैनोद्दीन खान पठाण, शेख सलीम शेख पाशा, शेख फईम शेख सलीम, गुलाम रब्बानी गुलाम रौस, शेख महेबूब शेख हुसेन आणि मोमीन रियाज उस्मान (सर्व रा. पेन्शनपुरा) या दहा जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर पोह अभिमान भालेराव यांच्या फिर्यादीवरून आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजवणी करण्यात येत असून याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांनी दिला आहे.