CoronaVirus : ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची दुप्पट भावात विक्री; बीडमध्ये व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:13 IST2020-04-10T19:08:03+5:302020-04-10T19:13:31+5:30
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

CoronaVirus : ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची दुप्पट भावात विक्री; बीडमध्ये व्हिडीओ व्हायरल
माजलगाव : जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवा,प्रसार माध्यम व प्रशासनास पेट्रोल व डिझेल ची विक्री करण्याची परवानगी असताना तालुक्यात विविध ठिकाणी टपरी,किराणा दुकानवर 150 रु लिटर ने पेट्रोल व डिझेल ची विक्री केली जात असल्याचा प्रकार एका युवकाने माऊली फाटा ता माजलगाव येथे आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळें एकच खळबळ उडाली आहे.पोलीस व प्रशासनाचे याकडे मात्र लक्ष नाही.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त रस्त्यावर कोणी ही दिसू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी सर्वसामान्य माणसास पेट्रोल विक्री वर बंदी घातली आहे. याच गोष्टीचा फायदा घेत काही लोकांनी पेट्रोलचा काळाबाजार सुरू केला असून अशा विक्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
नागरिकांना फळभाज्या मिळाव्यात म्हणून ग्रामीण भागातून फळ भाजीपाला, दूध,जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी त्यांना पेट्रोल मिळावे म्हणून पास देण्यात आल्या आहेत. मात्र काही पेट्रोल पंप चालक मात्र प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत काळाबाजार करून इंधन विक्री करणाऱ्यांना पेट्रोल देत आहेत. यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण सदरील पेट्रोल विक्री करणाऱ्यास पेट्रोल मध्ये रॉकेल मिक्स केल्यामुळे त्याची गाडी बंद पडली असल्याने जाब विचारत आहे. तसेच पेट्रोल 150 रु ने विकत घेतल्याचे ही बोलत आहे.त्याच वेळी दुसऱ्या दुचाकीस्वारास ही त्या ठिकाणी पेट्रोल विक्री होत असल्याचे दिसून येते. या व्हिडीओमुळे इंधनाचा काळाबाजार उघड झाला असून प्रशासनाने पेट्रोल विक्री करणाऱ्यासह त्याला पेट्रोल देणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
नियमबाह्य पेट्रोल विक्री करणाऱ्या सदर व्यक्तीला सापडुन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
-- डॉ. प्रतिभा गोरे , तहसीलदार