Coronavirus: बीडमधील संशयीत डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 20:34 IST2020-03-22T20:34:10+5:302020-03-22T20:34:31+5:30
संशयित डॉक्टर स्वतःहून रुग्णालयात भरती झाला होता

Coronavirus: बीडमधील संशयीत डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह
बीड : जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये कोरोन संशयीत म्हणून उपचार घेत असलेल्या डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर रविवारी सकाळी आणखी एका संशयिताचा स्वॅप तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविला आहे.
बीड रहिवाशी असलेल्या एका डॉक्टरने मुंबईतील विमानतळावर कर्तव्य बजावले होते. दोन दिवसांपूर्वी ते बीडला आले. घरी येताच त्यांना खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे जाणवल्याने ते स्वत: आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झाले होते. त्यांचा स्वॅप तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविला होता. रविवारी सायंकाळी याचा अहवाल आला असून तो निगेटिव्ह असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील एक ६० वर्षीय व्यक्ती साधारण १५ दिवसांपूर्वी पुण्यातील मुलाला भेटून परत आला होता. चार ते पाच दिवसांपूर्वी जुलाब लागल्याने त्याला बीडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला रविवारी जिल्हा रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. त्यानंतर स्वॅप तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या वृद्धाला कसलाही प्रवासाचा इतिहास नाही, असे सांगण्यात आले.