coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:58 IST2020-07-30T18:56:26+5:302020-07-30T18:58:55+5:30
आरोग्य विभाग, पोलीस व कारागृह प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकले आहेत.

coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन
बीड : केज तालुक्यातील पुजारी खून प्रकरणातील कोरोना पॉझिटिव्ह आरोपीने जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. बीडच्या आयटीआय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला पाठविण्यापूर्वीच त्याने धूम ठोकल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इकडे आरोग्य विभाग, पोलीस व कारागृह प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकले आहेत. यानिमित्ताने प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.
केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथील मंदिरातील पुजारी खून प्रकरणातील आरोपींना १३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी झाल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. कारागृहात जाण्यापूर्वी त्या सर्व आरोपींचे स्वॅब घेण्यात आले. यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना २२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार करून ठिक झाल्याने आणि कमी लक्षणे असल्याने त्यांना कोवीड केअर सेंटरला पाठविले जाणार होते. सायंकाळी याची प्रक्रियाही पूर्ण झाली. आपल्याकडे कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून या आरोपीने रुग्णालयातून धूम ठोकली.