coronavirus : बीडकरांच्या चिंतेत भर; आणखी दोन पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:17 IST2020-05-18T21:16:34+5:302020-05-18T21:17:25+5:30
यातील एकजण कोरोनामुक्त झाला आहे

coronavirus : बीडकरांच्या चिंतेत भर; आणखी दोन पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १२ वर
बीड : मुंबईहून परतलेले आणखी दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १२ रुग्ण आढळले होते. पैकी एक कोरोनामुक्त झाला असून, दुस-या एका ६५ वर्षीय वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील दोघे जण ११ मे रोजी गावी आले होते. रविवारी त्यांना लक्षणे जाणवताच रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्यांचे स्वॅब घेतले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सध्या जिल्हा रुग्णालयात सोमवारच्या दोन रुग्णांसह अगोदरचे २ अशा चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सोमवारी ७७ कोरोना संशयितांचे स्वॅब घेतले होते. पैकी ७३ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन पॉझिटिव्ह, तर दोघांचा निष्कर्ष निघत नसल्याने अहवाल प्रलंबित आहे.
११ मे रोजी मुंबईहून ४० लोक एका ट्रॅव्हल्समधून बीड जिल्ह्यात आले होते. या सर्वांनी प्रशासनाकडून परवानगी घेतली होती. हे सर्व लोक माजलगाव, बीड व वडवणी तालुक्यातील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. आता त्यांचेही स्वॅब घेतले जाण्याची शक्यता आहे.