Coronavirus : मुंबईच्या विमानतळावर कर्तव्य बजावून परतलेला बीडचा डॉक्टर आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 09:03 IST2020-03-22T09:02:57+5:302020-03-22T09:03:24+5:30
ताप आणि खोकला जाणवल्याने स्वतःहून रुग्णालयात दाखल

Coronavirus : मुंबईच्या विमानतळावर कर्तव्य बजावून परतलेला बीडचा डॉक्टर आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल
बीड : बीड रहिवाशी असलेल्या डॉक्टरने मुंबईच्या विमानताळवर कर्तव्य बजावले होते. दोन दिवसापूर्वी ते बीडला परतले. शनिवारी त्यांना ताप व खोकल्याची लक्षणे जाणवल्याने त्यांनी स्वता: आरोग्य विभागाशी संपर्क केला. रात्री 8 वाजता ते जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झाले आहेत.
बीडमधील एक २२ वर्षीय डॉक्टर मुंबईला राहतात. त्यांची मुंबईच्या एका विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ड्यूटी लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी ते सुटीवर बीडला आहेत. शनिवारी सकाळीच त्यांना ताप आणि खोकला आला. स्वता: डॉक्टर असल्याने आणि पुढील दुष्परिणाम माहिती असल्याने ते स्वता: दुपारी जिल्हा रुग्णालयात गेले. येथे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांची भेट घेतली. रात्री 8 वाजता त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. स्वॅप तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आतापर्यंत चार संशयीत; सर्वांचे निगेटिव्ह अहवाल
आतापर्यंत जिल्ह्यात चार व्यक्तींना संशयित म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅप घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर केवळ एका महिलेला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. इतर तिघांना लक्षणे नसल्याने घरीच ठेवून संपर्क करून पाठपुरावा केला जात होता.