CoronaVirus : गुलबर्गा सीमेवर अडकले परळीतील 200 ऊसतोड कामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 14:09 IST2020-03-30T14:08:53+5:302020-03-30T14:09:46+5:30
कारखाने बंद झाल्याने परतत होते परळीकडे

CoronaVirus : गुलबर्गा सीमेवर अडकले परळीतील 200 ऊसतोड कामगार
परळी: तामिळनाडू येथून परळीकडे निघालेल्या तालुक्यातील 200 ऊसतोड कामगार व 40 मुलांबाळांना कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमेवर रविवारी पोलिसांनी अडविले आहे. हे सर्व कामगार परळी तालुक्यातील असून ऊसतोड कामासाठी 16 मार्च रोजी ते सर्व तामिळनाडू येथे गेले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतिल साखर कारखाना बंद ठेवण्यात आल्याने तेथील ऊसतोड कामगारांना कामावरून कमी केले आहे. त्यात परळी तालुक्यातील दारावती तांडा, वसंत नगर तांडा ,मालेवाडी वैजवाडी व परिसरातील 200 ऊसतोड कामगार आहेत त्यात 100 महिला व 100 पुरुषांचा समावेश आहे. तीन दिवसापूर्वी ऊसतोड कामगार हे तामिळनाडू येथून परळी कडे येण्यासाठी निघाले होते त्यांना रविवारी गुलबर्गा येथे सायंकाळी पोलिसांनी अडवले आहे. त्यांना घराकडे परतता येत नसल्याने आणि पुरेसा धान्यसाठा नसल्याने जेवणाचे हाल होत आहेत. याची माहिती मिळाताच कामगारांचे परळीतील नातेवाईक काळजीत पडले आहेत. सर्व मजुरांना लागलीच परळी इथे परत आणण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शांता राठोड व नातेवाईकांनी केली आहे.