Corona Virus : आता अत्यावश्यक सेवा देणारी वाहने जाणार विना अडथळा; प्रादेशिक परिवहन विभाग लावणार स्टीकर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 16:58 IST2020-03-26T16:53:20+5:302020-03-26T16:58:02+5:30
या स्टिकर्समुळे निर्धोक जाणे होणार शक्य

Corona Virus : आता अत्यावश्यक सेवा देणारी वाहने जाणार विना अडथळा; प्रादेशिक परिवहन विभाग लावणार स्टीकर्स
अंबाजोगाई - लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देणाऱ्या वाहनांना वाहतूक व्यवस्था करतांना अडसर येऊ नये म्हणून अंबाजोगाई उपविभागातील अशा वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांना स्टीकर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे अशा वाहनांना आता अडसर न राहिल्याने अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुकर होणार आहे.
अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत अंबाजोगाई, परळी, माजलगाव, केज, धारूर, वडवणी या सहा तालुक्यांचा समावेश येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच गावोगावी संचारबंदी आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या वाहनांमधून विविध वस्तूंची वाहतूक होते. त्या वाहनांची तपासणी टोलनाके व विविध ठिकाणी केली जात होती. हा अडसर येत असल्याने अनेक वाहनचालक त्रस्त झाले होते. तसेच अशा वाहनांना अडथळे निर्माण होऊन अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवितांना कसलाही अडसर येऊ नये म्हणून अशा वाहनांना आता उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. या स्टीकर्सचे वितरण अंबाजोगाईच्या कार्यालयातून सुरू आहे.
या कामी उपप्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी कार्यालयात गर्दी न करता मेलवर अर्ज करून स्टीकर्स उपलब्ध करून घ्यावेत व अत्यावश्यक सुविधा सुरळीत ठेवावी. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकुल यांनी दिली.