Corona Virus In Beed : भय इथले संपत नाही...अंबाजोगाईत ३० मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 17:47 IST2021-04-25T17:45:08+5:302021-04-25T17:47:14+5:30
30 patients death due to Corona virus आजपर्यंतची सर्वात मोठी संख्या,कोरोनाचा कहर सुरूच

Corona Virus In Beed : भय इथले संपत नाही...अंबाजोगाईत ३० मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात अधिक प्रादुर्भाव आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या ३० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जणांना अग्नीडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालल्याने भय इथले संपत नाही,अशीच स्थिती झाली आहे.
दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत.अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा ज्यास्त रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शनिवार आणि शनिवार असे दोनच दिवसात एकूण ३० मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. हि दोन्ही ठिकाणी कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात असे संबंधितांनी सांगितले.