मसाल्याच्या ठसक्यापेक्षा कोरोनाचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST2021-03-23T04:35:58+5:302021-03-23T04:35:58+5:30
बाजारात मिळणाऱ्या आयत्या मसाल्यांच्या तुलनेत घरगुती मसल्याला जिल्ह्यात प्राधान्य दिले जाते. शुध्द, हवा तसा स्वाद आणि आवडीच्या रंगासाठी मिरची ...

मसाल्याच्या ठसक्यापेक्षा कोरोनाचा धसका
बाजारात मिळणाऱ्या आयत्या मसाल्यांच्या तुलनेत घरगुती मसल्याला जिल्ह्यात प्राधान्य दिले जाते. शुध्द, हवा तसा स्वाद आणि आवडीच्या रंगासाठी मिरची आणि खोबऱ्याचे भाजणे गृहिणींचा हातखंडा आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच बाजारात मिरची आणि मसाल्याच्या पदार्थांना मागणी असते. यंदा फेब्रुवारीपासून कोरानाने पुन्हा उसळी घेतल्याने अनेकांनी घरगुती मसाला बनवायचे तूर्त टाळले आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकी नसल्याचे चित्र दिसत आहे. मिरचीच्या प्रमाणानुसार इतर मसाला साहित्याची खरेदी ग्राहक करतात. हे साहित्य सरासरी ८०० ते एक हजार रूपये किलो आहे. मात्र सध्या काेरोनामुळे बाजारात विस्कळीतपणा आल्याचे मसाल्याचे व्यापारी संतोष सारडा यांनी सांगितले.
मिरचीचे दर (प्रती किलो)
बेडगी (अस्सल) - २७०-३००
लवंगी -१५०
तेजा १३० -१६५
मसाल्याचे दर (प्रती किलो)
धने- १२०
जिरे- २००
तीळ - १३०
खसखस - १७००
खोबरे- २१०
मेथी - ८०
हळद - १४०
अन्य मसाले (प्रती दहा ग्रॅम)
लवंग - १०
बाद्यानफुल (चक्री) - २०
बडीशेप - ७
नाकेश्वर - २५
धोंडफूल - १०
वेलदोडे - १०
दालचिनी -१०
मिरे -१०
शहाजिरा -१५
तेजपान - १०
रामपत्री १५
जायपत्री- २५
स्थानिक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. सहस हिरवी मिरची विकण्याकडे त्यांचा कल असतो.
परंतू मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीची आंध्र प्रदेशातील गुंटूर, वरंगल बाजारातून आवक होते. या मिरचीचा स्वाद वेगळा असतो. दिसायला लाल परंतू स्वादात कमी तिखट असणाऱ्या काश्मिरी मिरचीला येथील बाजारात मागणी नसल्याने उपलब्धता नसते. नंदुरबार भागातूनही मिरचीची आवक होते.
----
उन्हाळ्यात मार्च ते मे या कालावधीत मिरचीला उठाव असतो. मागील वर्षीच्या तुलनेत दर उतरलेले म्हणजेच कमी आहेत. कोरोनाचा दुष्परिणाम बाजारावर झाला आहे. - किशोर नहार, मिरचीचे व्यापारी
----------
कोरोनामुळे खर्च वाढले आहेत. मिरचीचे भाव कमी असलेतरी रोज लागणारे गोडेतेल १७० रूपये किलोपर्यंत पाेहचले आहे. गॅसचे दरही वाढले आहेत. घरगुती मसाला करतो, परंतू महागाईमुळे लागेल तेवढाच बनविणार आहोत. - छाया राठौर, गृहिणी.
----------
मी ३० वर्षांपासून घरीच मसाला करते. घरातल्या व्यक्तींना आवश्यक स्वाद आणि प्रमाणानुसार मिरची व मसाला आणून मसाला करतो, सुनबाईंची साथ असते. रेडीमेडपेक्षा घरगुती मसाला चांगला व ताजा असतो. - सुनीता भगिरथ आघाव, बीड.