कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:06+5:302021-06-27T04:22:06+5:30
बीड : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे विविध कारणांमुळे वाढलेली चिंता, नैराश्य आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप उडाली ...

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप
बीड : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे विविध कारणांमुळे वाढलेली चिंता, नैराश्य आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप उडाली असून, बदलत्या लाईफस्टाईलमुळे विविध आजार बळावत आहेत.
ताणतणाव, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मध्येच जाग येणे अशा समस्या वाढल्या आहेत. काहींना तर मुळातच झोप लागत नाही. व्यवस्थित झोप झाली नाही, तर त्याचे विपरित परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावरसुद्धा दिसू लागतात. पुरेशी झोप झाली नाही, तर लक्ष सतत विचलित होऊन कामाच्या ठिकाणी त्रास होतो. झोप पूर्ण न झाल्याने भूक, कामाची व इतर शरीरधर्मांची वेळसुद्धा नियमितपणे पाळली जात नाही. ज्यामुळे पित्तासारखे आजार असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
भारतीयांची जीवनशैली समाजप्रेमी व समूहप्रेमी आहे. मात्र कोरोनाकाळात अनेकांना घरातच राहावे लागल्याने एकटेपणा वाढला. अनेकांचा रोजगार हिरावला. आजाराची भीती आणि आजारामुळे चिंता वाढल्या. या आव्हानांना तोंड देताना आलेले नैराश्य तसेच कौटुंबिक ताणतणावामुळे शरीराला पुरेशी झोप मिळाली नसल्याने इतर आजार बळावत आहेत; तर दुसरीकडे मनोरंजनासाठी रात्रीपासून पहाटेपर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईलच्या सतत वापरामुळे मुलांसह मोठेदेखील या सवयीचे अधीन झाले आहेत. तर कोरोनामुळे व्यसनाधीनताही वाढल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. झोपण्याची नियमित वेळ बिघडल्याने दैनंदिन वेळापत्रक बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेकांना मेंदू, हृदयरोग, यकृताच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून, बिघडलेल्या मनस्थितीचे प्रमाण चिंताजनक आहे.
------------------
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
दोन किंवा मर्यादित वेळेपेक्षा जास्त टी.व्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या वापरामुळे इंटरनेट ॲडिक्ट होणाऱ्यांचे प्रमाण वाढले.
झोप कमी झाल्यामुळे दुसऱ्यादिवशीचे नियोजन बिघडते. मेंदू, हृदय, यकृतासह शरीराच्या अवयवांना विश्रांती मिळत नाही. झोप कमी झाल्यास शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.
--------------
झोप का उडते
व्यायामाचा अभाव असल्याने थकवा येत नाही, त्यामुळे झोप उडते. विविध व्यसनांच्या आहारी गेल्याने झोप येत नाही. आजार किंवा दुखत असेल, तर झोप लागत नाही. मानसिक आजार, उदासीनता, नैराश्य तसेच विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या चिंता, ताणतणावामुळे झोप उडते.
----------
टी. व्ही., मोबाईल व इतर गॅजेटसाठी वेळमर्यादेचे भान ठेवावे. दोन तासांपेक्षा जास्त वापर नसावा, वेळ निश्चित करावी. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सद्यपरिस्थितीत आठ तास झोप आवश्यक आहे. झोप घेतल्यामुळे मेंदू, हृद्य, यकृतासह इतर अवयवांना आराम मिळतो. ताण कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. - डॉ. सुदाम मोगले, मनोविकार तज्ज्ञ, बीड.
-----------------
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या नको
झोप येत नसल्याने अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधी, गोळ्या घेतात, हे टाळणे आवश्यक आहे. गोळ्यांची शरीराला सवय लागते. पुढे चालून गोळीशिवाय झोप येत नाही, त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात.
-------------
चांगली झोप यावी म्हणून
ध्यानधारण करून मनाची एकाग्रता वाढवा, मंत्रोच्चार केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, गरुडासन, अर्धचंद्रासन, शीर्षासन आदी योगासने करावीत. दररोज व्यायाम केल्यास वजन आटोक्यात राहते, ताण कमी होतो. आवडीचे संगीत ऐकावे, ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
-----------
झोपण्यापूर्वी दोन तास आधी कोणताही स्क्रीन (मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप) पाहायचा नाही. व्यायाम करावा. रोज सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. झोपेच्या चार तास आधीपासून चहा, कॉफी, टाळले पाहिजे. कॅफिनयुक्त पदार्थ टाळावे. मेडिटेशन करावे. झोपेच्या ठिकाणी मंद प्रकाश आणि वातावरण अल्हाददायक असावे. - डॉ. अनुराग पांगरीकर, अध्यक्ष, आयएमए, बीड.
------------
नेमकी झोप किती हवी
नवजात बाळ - १४ ते १७ तास
एक ते पाच वर्षे - १० ते १४ तास
शाळेत जाणारी मुले - ९ ते ११ तास
२१ ते ४० - ८ ते १० तास
४१ ते ६०- ७ ते ९ तास
६१ पेक्षा जास्त - ७ ते ८ तास
----------