कोरोनाने रोजगार हिरावला, कौटुंबिक हिंसाचारही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:16+5:302021-03-05T04:33:16+5:30
बीड : कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे झालेल्या ...

कोरोनाने रोजगार हिरावला, कौटुंबिक हिंसाचारही वाढला
बीड : कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे झालेल्या टाळेबंदी काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले होते. त्यामुळे घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मागील वर्षी मार्चमध्ये राज्यभर लॉकडाऊन होता. यावेळी अनेक उद्योगधंदे बंद, ठप्प झाले होते. त्यामुळे कामगारदेखील कपात करण्यात आले होते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातून पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांत रोजगारासाठी गेलेल्यांची संख्यादेखील जास्त आहे. दरम्यान, अनेकांच्या हातचे रोजगार गेले होते. या परिस्थितीमुळे सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थितीदेखील अनेकांची बिघडली होती. घरखर्च भागवणेदेखील कठिण झाले होते. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊन, पत्नीस मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी, तसेच माहेरी निघून जा म्हणत शारीरिक, मानसिक त्रास देणे अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. टोकाचे वाद होऊन ही प्रकरणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल किंवा महिला व मुलांकरिता सहाय कक्ष या विभागात तक्रारी येतात. या ठिकाणी पती-पत्नी तसेच कुटुंबाची समजूत काढून तडजोड केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा सुरू होतात तर, काहींचे दुभंगतात. मात्र, वाढत असलेली प्रकरणे चिंतेचा विषय बनत आहेत.
या कारणांमुळे होतात तक्रारी
पती-पत्नी किंवा कुटुंबात माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत पत्नीची छळवणूक, मुलगा होत नाही, दुचाकी घेण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे मागणे अशी कारणं असलेल्या तक्रारी सर्वाधिक आहेत.
३५ प्रकरणांमध्ये तडजोडी
भरोसा सेल किंवा महिला व मुलांसाठी असलेल्या सहायता कक्षातील २०२१ या वर्षातील तक्रारींपैकी जवळपास ३५ प्रकरणांमध्ये तडजोड मध्यस्थी करून दुभंगलेले संसार पुन्हा जुळवण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.
२०१९ -९१३
२०२० - ५६६
२०२१ - १२८