कोरोनाने बिघडवले गावातील आर्थिक चक्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:59+5:302021-07-13T04:07:59+5:30
बेरोजगारांची संख्या वाढली शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी अंबाजोगाई : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन ...

कोरोनाने बिघडवले गावातील आर्थिक चक्र
बेरोजगारांची संख्या वाढली
शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी
अंबाजोगाई : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन करण्यात आले. सध्या शिथिलता देण्यात आली असली, तरी धोका अद्याप कायम आहे. दरम्यान, गावागावात बेरोजगारांची संख्या वाढली असून, त्यांच्यात नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.
कोरोना संकटामुळे व्यवसाय- उद्योगधंदांना पाहिजे तशी गती नाही. मजुरांच्या हाताला काम उरले नाही. परिणामी, मजुरांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहे. सध्या शेती हंगामाचे दिवस असल्यामुळे काही जण शेतीत राबू लागले. काही दशकांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, अशी गावखेड्यात अवस्था होती. मात्र, लहरी निसर्ग, सरकारची शेतकरी विरोधी धोरण, मजुरांचे वाढते दर शेतमालाला खर्चाच्या तुलनेत कमी हमी भाव, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट आदी बाबींमुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहेत. परिणामी, बेरोजगार युवक शहरात जाऊन नोकरी करू लागला. मात्र, कोरोना संकटामुळे सर्वांचे गणित बिघडले आहे.
अनेकांनी छोटा व्यवसाय सुरू केला आहे, तर काही जणांनी आई-वडिलांना मदत म्हणून शेतात काम करणे सुरू केले आहे. अनेक लहान-मोठ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेतीतूनच होतो. यावरून आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व लक्षात येते. मात्र, दिवसेंदिवस शेती करणेही कठीण होत आहे. रासायनिक खते, बियाण्यांचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यातच निसर्गही साथ देत नसल्यामुळे बेरोजगार युवक शेती करण्यापेक्षा दुसऱ्यांकडे नोकर राहण्याला पसंती देत आहेत.