कोरोना, बिबट्यामुळे धास्तावला अन् पावसामुळे सुखावला आष्टी तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST2020-12-31T04:31:50+5:302020-12-31T04:31:50+5:30
आष्टी : एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखला जात असताना जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून ...

कोरोना, बिबट्यामुळे धास्तावला अन् पावसामुळे सुखावला आष्टी तालुका
आष्टी : एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखला जात असताना जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला. कोरोनाचे संकट असतानाच तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील तीन जणांना जीव गमवावा लागला. कोरोनाची महामारी तर बिबट्याच्या दहशतीमुळे सरते २०२० वर्ष कायम स्मरणात राहणार आहे.
तालुक्यात अपघात, खून, दरोडे, चोऱ्यांमुळे सरते वर्ष गाजले. जिल्ह्यात कोरानाची सुरुवात आष्टी तालुक्यात झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होते. प्रशासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करीत नागरिकांनी कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला. या महामारीचे संकट असतानाच बिबट्याने पैठण, पाथर्डी मार्गावरून तालुक्यात शिरकाव केला. सुरुडी येथील पं. स. सदस्य नागनाथ गर्जे व नंतर किन्ही येथील १० वर्षीय स्वराज भापकर या चिमुकल्याचा बिबट्याने बळी घेतला. त्यानंतर जोगेश्वरी पारगाव येथील महिला सुरेखा बळे या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. घरी परतत असताना त्यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला. बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडून दिल्याने शेतातील कामे खोळंबली. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी १०० च्या वर कर्मचारी पथके तैनात केले होते. करमाळा येथे वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार केले. कोरोना, बिबट्याबरोबरच नगर-बीड रोडवरील अपघातांनी चिंता वाढविली.
चौकट
तहानलेले आष्टीकर सुखावले
मागील ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या आष्टी तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. तर जनावरांसाठी चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू होते. त्यानंतर २०२० मध्ये जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील तलाव, धरणे, नदी, नाल्या ओसंडून वाहिल्याने पिके जोमात आली. त्यातून भरघोस उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.